Education : अपुऱ्या मनुष्यबळामुळे संशोधनाला ‘ब्रेक’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Education Policy
अपुऱ्या मनुष्यबळामुळे संशोधनाला ‘ब्रेक’!

Education : अपुऱ्या मनुष्यबळामुळे संशोधनाला ‘ब्रेक’!

पुणे : प्राध्यापकांच्या रिक्त पदांमुळे केवळ अध्यापनाला फटका बसला नसून, दीर्घकालीन संशोधनाबरोबरच समाजविज्ञानातील मूलभूत ज्ञाननिर्मितीलाच ‘ब्रेक’ लागला आहे. संविधानाला अभिप्रेत सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्यायाचे आंतरिक पद्धतीने अध्ययन, संशोधन आणि ज्ञाननिर्मिती करणाऱ्या मानव्यविद्याशाखांची तर राज्यभरात दैनावस्था झाली आहे.

राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक पूर्णवेळ प्राध्यापकांची पदे रिक्त असून, विद्यापीठांमध्ये तर याहून भिषणस्थिती निर्माण झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तर ३८४ पैकी तब्बल २१५ पदे रिक्त आहे. यात मानव्यविद्याशाखांमध्ये तर एक-दोन प्राध्यापकांच्या जिवावर विभागांचे कामकाज चालू आहे. विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर कंत्राटी सहायक प्राध्यापकांची पदे भरली, मात्र त्यामुळे दीर्घकालीन संशोधन आणि ज्ञाननिर्मितीला कोणताच फायदा होणार नाही. तर दुसरीकडे मानव्यविद्याशाखेत पदवी स्तरावर कौशल्याभिमूख अभ्यासक्रमांचा अभाव आणि विद्यार्थ्यांचाही मर्यादित संधींकडे पाहण्याचा दृष्टिकोन या विद्याशाखेला घातक ठरत आहे.

नक्की प्रश्न काय?
प्राध्यापकांच्या रिक्त पदांबरोबरच पूर्णवेळ संशोधकांची घटती संख्या मानव्य विद्या शाखेसाठी चिंताजनक बाब आहे. समाजविज्ञान, कला, भाषा आदींमधील मुल्याधारीत संशोधन समाजाला दिशा देण्याचे काम करते, मात्र गेल्या काही वर्षांपासून अपुऱ्या मनुष्यबळाच्या समस्येशी ही विद्याशाखा झगडत आहे. याचे दीर्घकालीन परिणाम सामाजिक व्यवहारांवर होण्याची शक्यता.

घडतंय काय?
प्राध्यापकांच्या रिक्त पदांमुळे संशोधन मार्गदर्शकांची विद्यापीठ स्तरावर कमतरता भासत आहे. पर्यायाने विद्यापीठाचे विभागांमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्याला तालुकास्तरावर असलेल्या संशोधन केंद्रावर जावे लागते. तिथे परिपूर्ण मार्गदर्शनाबरोबरच इतर सुविधा मिळतीलच असे नाही. तसेच ज्ञानाच्या हस्तांतरासाठी पूर्णवेळ व्यक्ती नसल्यामुळे अनेक गोष्टी काळाच्या ओघात नष्ट होण्याची शक्यता.

उपाययोजना
- प्राध्यापकांची आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरावीत
- मानव्यविद्याशाखेतील संशोधन थेट उद्योगान्मुख नसल्यामुळे अतिरिक्त संशोधन निधीची आवश्यकता
- ज्या विद्यार्थ्यांना रोजगार मिळवायचा आहे, अशांसाठी महाविद्यालय स्तरावरच कौशल्याभिमूख अभ्यासक्रम सुरू करणे गरजेचे
- संशोधनातील संधी अधिक वाढविण्याबरोबरच डिजिटल ह्युमॅनिटीसाठी पूरक वातावरण तयार करणे

विद्यापीठीय ज्ञान निर्मितीची प्रक्रिया ही समाजाच्या दीर्घकालीन फायद्यासाठी असते. समाजाला दिशा देण्याबरोबरच समाजशास्त्रातील मूलभूत ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया विद्यापीठ स्तरावर होते. त्यामुळे पूर्णवेळ प्राध्यापक भरती बरोबरच संशोधनात्मक मोकळीक गरजेची आहे.
- डॉ. श्रद्धा कुंभोजकर, इतिहासाच्या विभागप्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी स्तरावरच विद्यार्थ्यांच्या पायाभरणीसाठी महत्त्वपूर्ण बदल अपेक्षीत आहे. कौशल्याभिमूख अभ्यासक्रमांच्या तरतुदीबरोबरच विद्यार्थ्यांनीही मर्यादीतसंधींच्या पुढे पाहिले पाहिजे.
- प्रा. बाबासाहेब दुधभाते

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मानव्य विद्या शाखेतील पूर्णवेळ प्राध्यापकांची रिक्त पदे
विषय ः मंजूर पदे ः रिक्त पदे
१) मराठी ः ७ ः ४
२) इंग्रजी ः ८ ः ६
३) इतिहास ः ८ ः ६
४) हिंदी ः ८ ः २
५) राज्यशास्र व प्रशासन ः १२ ः ६
६) समाजशास्त्र ः ९ ः ७
७) तत्वज्ञान ः १३ ः ७
८) परदेशी भाषा ः १४ ः १०

इतर विद्यापीठातील स्थिती
१) मुंबई ः हिंदी, इंग्रजी, मराठी विभागांमध्ये प्राध्यापकांच्या किमान पाचहून अधिक जागा रिक्त
२) नागपूर ः हिंदी विभागात सहा पैकी चार पदे रिक्त आहे, मराठी विभागात चार पैकी दोन रिक्त आहे, संस्कृत विभागात पाच पैकी चार पदे रिक्त आहे.