Pune Water Issue : वाढीव पाण्याबाबत पुणेकरांची निराशा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Water Issue
वाढीव पाण्याबाबत पुणेकरांची निराशा

Pune Water Issue : वाढीव पाण्याबाबत पुणेकरांची निराशा

पुणे : पुणे शहराची वाढती लोकसंख्या पाहता वाढीव पाण्याचा कोटा मिळणार का, याकडे लक्ष लागले असताना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत काही निर्णय झाला नाही. दरम्यान, महापालिका जलसंपदा विभागाकडून अगोदरच दरवर्षी २२ टीएमसी पाणी घेत आहे. त्यापैकी आठ टीएमसी पाणीगळती होत आहे. ती रोखल्यास शहराच्या पाण्यासोबत सिंचनाचाही प्रश्न सुटेल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दिली.

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री पाटील बोलत होते. पाटील म्हणाले, ‘‘पुणे शहरासाठी ११.५० टीएमसी पाणी कोटा मंजूर आहे. परंतु शहराच्या लोकसंख्येत वाढ झाल्यामुळे खडकवासला प्रकल्पातून २२ टीएमसी पाणी घेतले जात आहे. परंतु या पाणीपुरवठ्यापैकी आठ टीएमसी पाण्याची गळती होत आहे. ही पाणीगळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून, ८४ पैकी ५४ पाण्याच्या टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे.

महापालिकेने २४ बाय ७ समान पाणीपुरवठा योजना गतीने पूर्ण करावी. जायका प्रकल्प गतीने पूर्ण करावा. महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यास ३५ टक्के पाण्याची बचत होणार आहे. येत्या दीड वर्षांत ही सर्व कामे पूर्ण झाल्यास शहराच्या पाण्याचा आणि सिंचनासाठी पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी महापालिका आणि जलसंपदा विभागाने एकत्रित बैठक घ्यावी.’’

मुळशी धरणातील पाणी खर्चिक
मुळशी धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती केली जाते. वीजनिर्मितीनंतर या धरणातून शहराला पाणी उपलब्ध होण्यासाठी टाटांसोबत चर्चा सुरू आहे. परंतु ते पाणी उचलण्यासाठी येणारा खर्च अधिक आहे, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.