‘प्रा. राम बापट हे सामाजिक शास्त्रांचे ज्ञानकोश’ ः विनय हर्डीकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘प्रा. राम बापट हे सामाजिक
शास्त्रांचे ज्ञानकोश’ ः विनय हर्डीकर
‘प्रा. राम बापट हे सामाजिक शास्त्रांचे ज्ञानकोश’ ः विनय हर्डीकर

‘प्रा. राम बापट हे सामाजिक शास्त्रांचे ज्ञानकोश’ ः विनय हर्डीकर

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : ‘‘प्रा. राम बापट हे केवळ पोथीनिष्ठ मार्क्सवादी किंवा डावे नव्हते. त्यांना मुक्तिदायी परिवर्तनाची आस होती. ‘विचारसरणीचा अंत’ या बहुचर्चित संकल्पनेवर बापट यांचा विश्वास नव्हता. कारण ते विचारसरणीकडे जीवन समजण्याचा आणि बदलण्याचा मार्ग म्हणून पाहात होते. ते अखेरपर्यंत समाजशिक्षकाच्या भूमिकेत वावरले. एका अर्थाने ते सामाजिक शास्त्रांचे ज्ञानकोशच होते,’’ अशा शब्दांत लेखक विनय हर्डीकर यांनी प्रा. राम बापट यांच्या आठवणींना उजाळा दिला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे माजी प्रमुख प्रा. राम बापट यांच्या जयंतीनिमित्त विनय हर्डीकर व चेन्नईच्या ‘मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट स्टडीज’ येथील प्रा. अनंत गिरी यांच्या व्याख्यान आयोजित केले होते. त्या वेळी ते बोलत होते.
हर्डीकर म्हणाले, ‘‘प्रा. बापट यांचा खऱ्या अर्थाने सामाजिक शास्त्रांच्या सर्व विषयांत लीलया वावर राहिला. त्यांचे अष्टपैलू मन नेहमी प्रश्न उपस्थित करायचे आणि त्यांची उत्तरे शोधायचे.’’
‘बापट यांची बुद्धी आणि स्मरणशक्ती अत्यंत तीक्ष्ण होती व त्यांच्याकडे ज्ञानाचा प्रचंड साठा होता. केवळ विद्यार्थी, मित्रांचेच नव्हे, तर अनेक संस्था, चळवळींमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे ते मार्गदर्शक होते. त्यांना चर्चेसाठी कोणताही विषय वर्ज्य नसायचा. ते केवळ सिद्धांतातच रमले नाहीत, तर साहित्य, शास्त्रीय संगीत, चित्रपट, चित्रकला अशा क्षेत्रांविषयीही ते तितकेच जाणकार होते’, या शब्दांत हर्डीकर यांनी प्रा. बापट यांच्या व्यक्तिमत्वाचा उलगडा केला.
पर्यावरण विनाशाचे आव्हान आणि त्या अनुषंगाने राजकीय तत्त्वचिंतनात फेरबदल करण्याची निकड हा प्रा. बापट यांच्या आस्थेचा आणि लेखनाचा एक महत्त्वाचा विषय होता व त्यावर प्रा. गिरी यांनी मांडणी केली. राज्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. मंगेश कुलकर्णी यांनी आभार मानले.