पुणे तिथे काय नाही उणे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे तिथे काय नाही उणे?
पुणे तिथे काय नाही उणे?

पुणे तिथे काय नाही उणे?

sakal_logo
By

रिंगरोडच्या बातम्या वाचत-वाचत मी चक्क ८० वर्षे जगलो की! मेरा भारत महान. हे सगळं असं का होतं, पिढ्यानपिढ्या असं का चालू राहतं, आपण निमूटपणे का सहन करतो? कारण, मूलतः आपण व्यक्तीपूजक, वाचाळवीर आहोत. भोंदूपणाचा, भंपक कल्पनेचा टेंभा मिरवण्यात पटाईत आहोत.
- हिमांशू कुलकर्णी

आज कुठेतरी बातमी वाचली... ‘रिंगरोड सुसाट...’ १८ नोव्हेंबर २०२२! रिंगरोड खरंच झाला की काय?, मग स्वतःलाच चिमटा काढला. छे ! ही बातमीच फुसकी निघाली. हज्जारावी वगैरे असेल.
भानावर आलो... असंख्य नकाशे, रंगीत कल्पनाचित्र, तालुक्यांची नावं, गावांच्या याद्या, भाऊ, दादा, काका, साहेब, पालक-चालक, घातक, बाधक, मंत्र्यांची जंत्री, त्यांच्या परिषदा, वायदे, घोषणा अन् चेहरे सर्रकन डोळ्यासमोर आले. रथी-महारथी आठवले. पण, रिंगरोड काही कागदावरून जमिनीवर येईना. दरम्यान, नुसत्या चर्चा, घोषणा, बातम्या ऐकत माझ्या मुलाला मुलगा झाला. त्या ४० वर्षांत मी चक्क ८० वर्षांचा झालो.
खरंतर मी सरळ साधा, कर भरणारा, नियम पाळणारा, जीव मुठीत धरून रस्ता ओलांडण्यासाठी वणवण फिरणारा, कुठल्याही मतपेटीत न बसणारा केविलवाणा नागरिक. पण, ४० वर्षे म्हणजे जरा लईच झालं. विचार करायला लागलो. मग लांबलचक यादीच व्हायला लागली. सुरस रम्य, स्वप्नवत प्रकल्पांची. रिंगरोड, २४ बाय ७ पाणी, विमानतळ, छान, सुंदर, प्रशस्त रस्ते, अद्ययावत दुर्गंधीमुक्त रेल्वे स्टेशन, हिरवीगार उद्यानं, बालभारती रस्ता.... बोलाचीच कढी अन् बोलाचाच भात. अगदी नदी सुधार योजनेतल्या नद्यांची गटारं झाली; पण पुणे होतं तिथेच रुतून बसलं. ‘पुणे तिथे काय उणे’ म्हणता-म्हणता, पुणे तिथे काय नाही उणे? ही वेळ आपणच आणलीय आपल्यावर.
महा आणि राष्ट्र या दोन शब्दांनी बनलेल्या महाराष्ट्रातल्या औद्योगिक-सांस्कृतिक राजधानीचं शहर पुणे असं आपण म्हणतो. पण खरं सांगा, काय छान, सुंदर, स्वच्छ, प्रशस्त आहे पुण्यात? गाडीतळ, कुंभारवाडा, पर्वती, किती भकास अन् बकाल दिसतात? बसेस किती मोडकळलेल्या, जुनाट अस्वच्छ, केविलवाण्या दिसतात? कधी रस्त्यावरून चालताना चेहरे वाचत चला... किती त्रासिक, ओढलेले, गंजलेले, रंजलेले दिसतात. तरी रिक्षाच्यामागे लिहिलेलं असतं... ‘नाद करायचा नाय’, ‘आव्वाज कुणाचा’!
आयुष्यात जगभर फिरलो, राहिलो. नदीकाठची सुंदर शहरं पायी फिरलो. पूर्वी परत आलो की वाटायचे आपण १०० वर्षे मागे आहोत. हल्ली वाटतं आपण १५० वर्षे मागे आहोत. विकसित देशात एक स्वच्छ, सुबत्तेचा सुसभ्य दरवळ असतो, तो पुण्यात, देशात अभावानेच आढळतो. आता स्मार्ट सिटीचा उदोउदो चाललाय. सिटीतला कुठला भाग स्मार्ट झालाय?, कुठला रस्ता चालण्यायोग्य झालाय, कुठला पार्क बसण्यायोग्य झालाय? हो, मी मान्य करतो की माझा दृष्टिकोन ‘अर्धा पेला रिकामा’चा आहे. पण, आपण नेहमी अर्ध्या पेल्यावरच समाधानी व्हायचं?
लक्ष्मी रस्त्यावर वॉकिंग प्लाझा होणार का? रिंगरोड बघणार का? बसमध्ये जागा मिळणार का?, रस्ते नितळ गुळगुळीत होणार का?, नळाला पाणी येणार का?, झोपड्यांची छान घरं होणार का?, आरक्षण फक्त गरजूंना मिळणार का?, गुणवत्तेला न्याय मिळणार का?, जातपात संपणार का?, प्रत्येक हाताला काम मिळणार का?, पुणे, पुण्यनगरी होणार का? सतत प्रश्‍न विचारा. उत्तरं शोधा, मागा गप्प बसू नका.
जागे व्हा. विचार करा. आधी चांगला नागरिक, माणूस व्हा ! पण हक्क जरूर मागा. स्वार्थी, भ्रष्ट, नेत्यांना मतं देऊ नका. हे सगळं उद्या नाही आजच करा.