पंतप्रधान आवास योजना; यादी सात डिसेंबरपर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध होणार घरांची लॉटरी निघणार पुढील महिन्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंतप्रधान आवास योजना; यादी सात डिसेंबरपर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध होणार 

घरांची लॉटरी निघणार पुढील महिन्यात
पंतप्रधान आवास योजना; यादी सात डिसेंबरपर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध होणार घरांची लॉटरी निघणार पुढील महिन्यात

पंतप्रधान आवास योजना; यादी सात डिसेंबरपर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध होणार घरांची लॉटरी निघणार पुढील महिन्यात

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : पंतप्रधान आवास योजनेतंर्गत आर्थिकदृष्ट्या मागास (ईडब्लूएस) आणि अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) नागरिकांसाठी सुमारे एक हजार ६०४ घरांसाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत संपुष्टात आली आहे. दरम्यान, एलआयजी प्रवर्गातील ३८७ तर ईडब्लूएस प्रवर्गात ३७ अर्ज दाखल झाले आहेत. ७ डिसेंबर रोजी प्रारूप यादी, तर१५ डिसेंबर रोजी सोडत होणार आहे.
निगडी प्राधिकरण हद्दीतील पेठ क्रमांक १२ (मोशी) येथील आर्थिकदृष्ट्या मागासवर्गींसाठीच्या ३१ सदनिका आणि अल्प उत्पन्न गटातील ८२४ सदनिका आहेत. तर पेठ क्रमांक ३० आणि ३२ (वाल्हेकरवाडी) येथे आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठीच्या ३६६ आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांच्यासाठी ४१४ सदनिका आहेत. मोशी येथील डब्लूएस गटातील सदनिका या २९.५५ चौरस मीटरच्या असून त्यांची किमत सात लाख ४० हजार रुपये इतकी निश्‍चित केली आहे. तर एलआयजी गटातील सदनिका या ५९.५७ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या असून ३२ लाख रुपये निश्‍चित केली आहे. वाल्हेकरवाडी येथील इब्लूएस गटातील सदनिका या २५.५२ चौरस मीटरच्या असून त्यांची किमत १८ लाख ८० हजार ८२४ रुपये निश्‍चित केली आहे. तर एलआयजी गटासाठीच्या सदनिका या ३४.५७ मीटर असून २५ लाख ४७ हजार ८०९ रुपये अशी किमत निश्‍चित केली आहे.
या गृहप्रकल्पातील सदनिकांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत नुकतीच संपुष्टात आली आहे. पेठ क्र. १२ येथील ईडब्लूएस प्रवर्गासाठी एकूण ३१६ लाभार्थ्यांनी व एलआयजी(२ बीएचके) प्रवर्गासाठी एकूण २६२ लाभार्थ्यांनी दहा टक्के रक्कम भरून ऑनलाईन अर्जाची नोंदणी केली आहे. तर पेठ क्र. ३०-३२ येथील ईडब्लूएस (१आरके) गटासाठी एकूण ३७ लाभार्थ्यांनी व एलआयजी (१बीएचके) प्रवर्गासाठी एकूण १५५ लाभार्थ्यांनी दहा टक्के रक्कम भरून ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.

यादी संकेतस्थळावर उपलब्ध होणार
अर्ज नोंदणी केलेल्यांची प्रारूप यादी सात डिसेंबर रोजी प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध होणार आहे. या यादीबाबत काही हरकत असल्यास संबंधितांनी प्राधिकरणाच्या आकुर्डी येथील कार्यालयाशी संपर्क करावा. अंतिम यादी (ता. १२) आणि लॉटरीची सोडत (ता.१५) डिसेंबर रोजी प्राधिकरण कार्यालयात पार पडणार आहे, असेही पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.