
अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
पुणे, ता. २८ : फुगेविक्री करणाऱ्या महिलेच्या पाच वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न एका नागरिकाच्या सतर्कतेमुळे टळला. नागरिकाने मद्यपी व्यक्तीला चोप देत मुलीची सुटका केली, त्यानंतर त्यास पोलिसांच्या ताब्यात दिले.
राम टेकबहादुर (वय ३५, रा. वडगाव शेरी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २६ वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला या फुगेविक्रीचे काम करतात. २६ नोव्हेंबरला त्यांचे पतीसोबत भांडणे झाली. त्यामुळे त्या रात्री अकरा वाजता कल्याणीनगर परिसरात त्या आल्या. तेथेच त्या त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीसह झोपल्या होत्या. त्यावेळी दारू पिऊन तेथे आलेल्या राम टेकबहाद्दूरने महिलेच्या पाच वर्षीय मुलीला आईजवळून उचलून नेले. त्यानंतर त्याने मुलीला तेथील जवळच्या पडीक बांधकामाजवळ नेऊन तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथून जाणाऱ्या नवनाथ अडागळे यांना मुलीच्या रडण्याचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा, टेकबहादूर हा मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत होता. अडागळे यांनी मुलीची सुटका करून मद्यपीला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.