राजकारण्यांनी पातळी सोडून वर्तन ः बापट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजकारण्यांनी पातळी सोडून वर्तन ः बापट
राजकारण्यांनी पातळी सोडून वर्तन ः बापट

राजकारण्यांनी पातळी सोडून वर्तन ः बापट

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : गेले काही दिवस राजकारण अत्यंत गढूळ झाले आहे. राजकारण्यांनी पातळी सोडून वर्तन सुरू केले आहे. याला पुणे शहरही अपवाद राहिलेले नाही. याचा विचार सर्वच पक्षांनी आणि त्यांच्या नेतृत्वाने केला पाहिजे, अशा शब्दांत खासदार गिरीश बापट यांनी स्वः पक्षातील नेत्यांबरोबरच विरोधी पक्षाच्या नेत्यांचे सोमवारी ‘फेसबुक’च्या माध्यमातून कान टोचले. राजकारण विकासासाठी, सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी असले पाहिजे. हा हेतूच आज नष्ट होताना दिसत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

शेवगाव येथील सभेत राहुल गांधी यांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस भवनामध्ये घुसून गोंधळ घातला होता. या प्रकारानंतर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी खासदार बापट यांना पत्र लिहून राजकारणाच्या खालावत चालेल्या दर्जाबाबत नाराजी वक्त केली होती. तसेच, यात लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यामुळे बापट यांनी सोमवारी फेसबुकच्या माध्यमातून पुणे शहरातील राजकारणाच्या खालावत चालेल्या दर्जावर कडक शब्दांत टीका केली.
शहरात भटक्या कुत्र्यांपासून ते रस्त्यावरील खड्डे असे अनेक प्रश्‍न आहे. अनेक विकासाचे मुद्दे पडून आहेत. ही कामे करून घेण्यास सर्वजण मागे दिसत आहे. कारण, आपले नाव व बोर्ड लागणार नाही. श्रेयवादाच्या लढाईत आपण मागे पडू, असे सांगून शांत बसणारे अनेक महाभाग भेटतात, असा टोलही त्यांनी मारला.
देश व महाराष्ट्राला ज्या पुणे शहराने सांस्कृतिक आणि राजकीय नेतृत्व दिले, त्या पुण्यात असे घडत आहे, याबाबत सर्वांनीच पुनर्विचार केला पाहिजे. एखाद्या मुद्द्याला विरोध करणे, तो खोडून काढणे, आपली मते मांडणे, असे जे-जे लोकशाहीच्या चौकटीत बसते, ते करण्यास हरकत नाही. परंतु, गेल्या सहा-सात महिन्यांत बॅनर लावणे, जोडे मारणे, पुतळे जाळणे, महिलांबद्दल अपशब्द वापरणे, अशी आपली संस्कृती नाही. ज्या नागरीकांना राजकारणाशी देणे-घेणे नाही, ती मंडळी सद्यःस्थितीत मानसिकदृष्ट्या खूप अस्वस्थ आहेत. मतदान करावे की करू नये, या मनस्थितीपर्यंत काही लोक पोचले आहेत. सगळेच असे वागू लागले, तर सामान्य माणसांनी बघायचे कोणाकडे?, दुसरा कोणी सांगण्यापेक्षा प्रत्येक पक्षाने याचा विचार करून विकास कामांकडे लक्ष दिल्यास अधिक चांगले होईल, असेही ते म्हणाले.