जिल्हा परिषद शाळांमधील केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणार निम्म्या जागा पदोन्नतीने तर निम्म्या विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे; भरतीचा मार्ग मोकळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषद शाळांमधील केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणार
निम्म्या जागा पदोन्नतीने तर निम्म्या विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे; भरतीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद शाळांमधील केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणार निम्म्या जागा पदोन्नतीने तर निम्म्या विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे; भरतीचा मार्ग मोकळा

जिल्हा परिषद शाळांमधील केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणार निम्म्या जागा पदोन्नतीने तर निम्म्या विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे; भरतीचा मार्ग मोकळा

sakal_logo
By

पुणे, ता. १ : राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील केंद्रप्रमुखांच्या सध्या रिक्त असलेल्या जागांपैकी ५० टक्के जागा पदोन्नतीने तर ५० टक्के जागा मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असणाऱ्या केंद्रप्रमुखांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा होण्याची चिन्हे आहेत.

राज्यात केंद्रप्रमुखांची सेवानिवृत्ती, राजीनामा, बडतर्फी यामुळे रिक्त असलेली पदे यापुढे जशी पदे जसजशी रिक्त होतील, तसतशी ५० टक्के पदे पदोन्नतीने तर ५० टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या-त्या कोट्याच्या मर्यादेत भरण्यास मान्यता दिल्याचा अध्यादेश शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी काढला आहे. राज्यात जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळांत सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन, सतत उपस्थिती टिकवणे व शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी चार हजार ८६० केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करून १० जिल्हा परिषद प्राथमिक शाळांसाठी एका केंद्रप्रमुखाचे पद निश्चित करण्याबाबतचा निर्णय शासनाने यापूर्वी घेतला आहे. त्यानुसार एकूण चार हजार ८६० केंद्रप्रमुखांची पदे निर्माण करण्यात आली आहेत.

जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील उर्दू शाळांची संख्या विचारात घेऊन केंद्रप्रमुखाची पदे निश्चित करावीत, अशी सूचनाही करण्यात आली आहे. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणार आहेत. विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षाद्वारे केंद्रप्रमुखांच्या निवडीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचे आयोजन शासन निश्चित करेल, अशा परीक्षा यंत्रणेमार्फत आयोजित करण्यात येणार आहेत. या परीक्षा यंत्रणेकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात येतील आणि अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.

राज्यात केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. यापूर्वी ही पदे ४० :३०:३० या प्रमाणात भरण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु त्यांची अंमलबजावणी झाली नाही. सध्या पुणे जिल्ह्यात केंद्र प्रमुखांची ३०५ पदे मंजूर असून, प्रत्यक्षात मात्र केवळ १२३ केंद्रप्रमुख कार्यरत आहेत. सध्या एका केंद्रप्रमुखाकडे दोन ते तीन केंद्रांची अतिरिक्त जबाबदारी आहे. हवेली तालुक्यात २१ केंद्रप्रमुखांची पदे असून, प्रत्यक्षात ९ जण काम सांभाळतात. केंद्रप्रमुख हे शिक्षण विभागामधील प्रशासकीय यंत्रणेतील सर्वांत शेवटचा भाग असतात. त्यामुळे नव्या निर्णयाप्रमाणे पदभरती लवकरच होणे गरजेचे आहे.
- राजेंद्र जगताप, अध्यक्ष, पुणे जिल्हा केंद्रप्रमुख संघटना