१ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१

sakal_logo
By

पुणेकरांची अनोखी क्रीडा चळवळ

लीड
यंदाची पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन गेल्या वर्षीप्रमाणेच ‘नाईट मॅरेथॉन’ म्हणून रविवारी (ता.४) होत आहे. यानिमित्त या स्पर्धेचा घेतलेला आढावा.
- अॅड. अभय छाजेड

यंदाची ३६ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन गेल्या वर्षीप्रमाणेच ‘नाईट मॅरेथॉन’ म्हणून ४ डिसेंबर रोजी होत आहे. ही मॅरेथॉन सुरू करण्यात तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी, प्रल्हाद सावंत, क्रीडापटू रमेश तावडे यांचे मोठे योगदान होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचेही मार्गदर्शन सदैव लाभले. ३६ वर्षांपूर्वी सुरू झालेली मॅरेथॉन आता पुणेकरांची चळवळ बनली आहे. देशातील ही पहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आणि यापासून प्रेरणा घेऊन देशभर अनेक मॅरेथॉन सुरू झाल्या. पुण्यातील मॅरेथॉनचे मोठे यश म्हणजे ‘शारीरिक तंदुरुस्तीसाठी गांभिर्याने पळणे’ ही कल्पना येथे मूळ धरली. आता सकाळी व्यायामासाठी चालणे अथवा पळणे हा हजारोंचा नित्यक्रमच बनला. महानगरपालिकेनेही अनेक उद्याने उभारली, यात जॉगिंग ट्रॅक केले, रस्ते व फुटपाथ प्रशस्त केले. त्यामुळे या क्रीडा चळवळीला बळ मिळाले.
४२.१९५ किलोमीटरच्या मॅरेथॉनचा मार्ग पूर्वी शहराच्या मुख्य भागातूनच जात होता. या काळात पुणे वाढले आणि मार्गातही अनुरूप बदल झाले. यंदा सणस मैदान - सारसबाग - सिंहगड रस्ता - नांदेड सिटी - आतील सर्कलवरून त्याच मार्गाने माघारी असा मार्ग ‘नाईट मॅरेथॉन’साठी निश्चित केला आहे. एका अर्थाने शहराचे जुने आणि नवे रूपही या मॅरेथॉनने जवळून पाहिले आहे. पूर्वी मध्यवस्तीतून मॅरेथॉन जाताना चौका-चौकात कमानी उभारल्या जायच्या, रांगोळ्या काढल्या जायच्या, मार्गावर खेळाडूंचे फुले व फुगे, ढोल लेझीम याद्वारे स्वागत केले जायचे. धावपटूंचे स्वागत करण्याची परंपरा आजही चालू आहे. पुणेकरांचा उत्साह लक्षात घेऊन संपूर्ण वर्षभर मॅरेथॉन विषयक उपक्रम करण्याचा आमचा संकल्प आहे. या मॅरेथॉनमध्ये दरवर्षी शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय धावपटू भाग घेतात. अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाने तर एका वर्षी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनला ‘एशियन चॅम्पीयनशिप’चा दर्जा दिला होता. त्यावर्षी तर सर्वाधिक ३५० हून अधिक परदेशी धावपटू सहभागी झाले होते.
ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांनी पुण्याचे दीर्घकाळ राजकीय नेतृत्व केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे देशाचे दोन पंतप्रधान मॅरेथॉनच्या उद्घाटनासाठी आले होते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि इंद्रकुमार गुजराल यांच्या उपस्थितीमुळे मॅरेथॉनची शान वाढली. याआधी मॅरेथॉनला ज्येष्ठ नेते शरद पवार, तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, नारायण राणे तसेच अनेक केंद्रीय मंत्री व सिनेस्टार्सही आले आहेत.
यंदा यूट्यूबवर मॅरेथॉन मध्यरात्री थेट प्रक्षेपित करण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार आहोत. मॅरेथॉनमध्ये शाळकरी मुलांचा मोठा सहभाग असतो. अनेक शाळांमधील विशेषतः महानगरपालिकेच्या शाळांमधील गरीब विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे यासाठी त्यांच्याकडून कोणतेही शुल्क घेतले गेले नाही. लहान वयातच त्यांच्यात आवड निर्माण झाल्यास तरुण वयातही हे मॅरेथॉनमध्ये सहभागी होत राहतील, क्रीडाप्रेमी बनतील, मॅरेथॉनचे आधारस्तंभही बनतील. आर्थिक ऐपत नसणाऱ्या विद्यार्थ्यांचा मॅरेथॉनमधील मोठा सहभाग हा विशेष महत्त्वाचा आहे. ही मॅरेथॉन त्यांची आहे, त्यांच्या पालकांची आहे, पुणेकरांची आहे. जगाच्या नकाशावर पुणे अधोरेखित करण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबरच पुणे फेस्टिव्हल, पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन व पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यांचा निश्चितच मोठा वाटा आहे. अशी मॅरेथॉन सातत्याने वर्षानुवर्षे चालू ठेवणे अवघड असते. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनने हे साध्य केले. याचे श्रेय संयोजाकांबरोबरच सहभागी धावपटू, कार्यकर्ते यांबरोबरच पुणेकरांना देखील आहे. किंबहुना पुणेकरांनीच मॅरेथॉन ही क्रीडा चळवळ बनवली असे मानावे लागेल.