
रस्त्याची कामे २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश
पुणे, ता. १ : जी २० देशांची पुणे शहरातील पहिली बैठक जानेवारी महिन्यात होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी विभागप्रमुखांसह विमानतळ ते सेनापती बापट रस्त्याची गुरुवारी पाहणी केली. या पाहणी दरम्यान रस्त्यांचे डांबरीकरण, पदपथाची दुरुस्ती, दुभाजकांची रंगरंगोटीची आदी कामे येत्या २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.
या परिषदेतील काही बैठका पुणे, मुंबई आणि औरंगाबाद या तीन शहरांत होतील. यापैकी १३ ते १५ जानेवारी, १६ ते १८ जून व २८ व २९ जून रोजीच्या बैठका पुण्यात होणार आहेत. त्यानिमित्त पुण्यात येणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींना शहराचे विद्रूप, अस्वच्छ चित्र दिसू नये, यासाठी केंद्र व राज्य स्तरावर सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विमानतळ ते सेनापती बापट रस्त्याची पाहणी करण्यात आली. यावेळी आयुक्त विक्रम कुमार , नगरअभियंता प्रशांत वाघमारे, पथविभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, विद्युत विभागाचे प्रमुख श्रीनिवास कंदुल, प्रकल्प अभियंता श्रीनिवास बोनाला, मेट्रो, पीएमआरडीचे अधिकारी उपस्थित होते.
पाहणी करताना अनेक ठिकणी रस्ते खराब झाले असल्याचे निदर्शनास आले. त्या रस्त्यांचे डांबरीकरण करावे. ज्या रस्त्यावरील पदपथाची दुरवस्था झाली आहे, तेथील दुरुस्ती करावी, दुभाजकांची रंगरंगोटीची करावी, अशा सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यासाठी २५ डिसेंबरपर्यंतची डेडलाईन दिली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.