अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाबाबत माघार नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाबाबत माघार नाही
अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाबाबत माघार नाही

अथर्वशीर्ष अभ्यासक्रमाबाबत माघार नाही

sakal_logo
By

पुणे, ता. २ : एका गल्लीत चार-चार गणपती मंडळे हवीत; मात्र त्यांचा शास्त्रीय अभ्यासक्रम का नको? अथर्वशीर्षाचा अभ्यासक्रम हा पूर्णतः ऐच्छिक आणि विनामूल्य असून, त्याला विरोध का? केवळ राजकारण म्हणून विरोध नको. जर कुणाला काही नवे अभ्यासक्रम द्यायचे असतील तर त्यांनी ते द्यावे; पण आता अथर्वशीर्षावरून माघार नाही, असे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात आयोजित इंडियन जिओटेक्निकल सोसायटीच्या (आयजीएस) अमृतमहोत्सवी वर्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण झाले. या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ‘सीओईपी’चे कुलगुरू प्रा. मुकुल सुतावणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, आयजीएस पुणे चॅप्टरचे अध्यक्ष विकास पाटील, पुणे चॅप्टरचे संस्थापक रमेश कुलकर्णी, जनसेवा सहकारी बॅंकेचे डॉ. राजेंद्र हिरेमठ, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, विभागीय संचालक दत्तात्रय जाधव, भाजपचे संघटक सचिव राजेश पांडे आदी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर ट्रस्टने एक श्रेयांकाचा अथर्वशीर्ष अभ्यासक्रम सुरू केला असून, नुकतेच त्या संदर्भात वाद निर्माण झाले होते. त्यावर पाटील यांनी स्पष्टीकरण दिले.
कार्यक्रमात ‘आयजीएस’च्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमांची घोषणा व पुरस्कार देण्यात आले. ज्यात रमेश कुलकर्णी, डॉ. राजेंद्र हिरेमठ, प्रा. मुकुल सुतावणे यांचा समावेश होता. ‘आयजीएस’च्या स्थापनेपासून ते आजवरच्या कार्याचा लेखाजोखा विकास पाटील यांनी मांडला. तंत्रज्ञान विद्यापीठ म्हणून ‘सीओईपी’च्या भविष्यातील वाटचालीचा आलेख प्रा. सुतावणे यांनी मांडला. ते म्हणाले, ‘‘सीओईपीने अनेक उत्तुंग व्यक्तिमत्त्वे घडविली असून, काळाच्या खूप आधीच अनेक विद्यार्थिकेंद्रित निर्णयांची अंमलबजावणी केली आहे. उद्योग आणि शैक्षणिक संस्थांच्या समन्वयातून समाजाला रूचेल, पचेल, समजेल आणि झेपेल अशी वाटचाल आम्ही करणार आहोत.’’ डॉ. महेश शिंदीकर यांनी सूत्रसंचालन केले.

---
फोटो ः 08757
-----------------