
पुण्यात आढळला ‘जेई’चा पहिला रुग्ण!
पुणे, ता. २ : डासांपासून पसरणाऱ्या ‘जेई’ (जापनीस इन्सेफलायटीस) आजाराचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला आहे. चार वर्षांच्या मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याला १७ दिवस त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करून प्रकृती सुधारल्याने आता वॉर्डमध्ये हलविण्यात आले आहे.
पुणे शहरातील जापनीस इन्सेफलायटीस (जापनीस मेंदूज्वर) झाल्याचे निदान वडगाव शेरी भागातील चार वर्षांच्या मुलाला झाले. ताप, अशक्तपणा आणि फिट येणे अशी लक्षणे त्या मुलाला होती. त्याच्या रक्ताचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले. त्याचा अहवाल २९ नोव्हेंबरला मिळाला. त्यात रुग्णाला ‘जेई’चा संसर्ग झाल्याचे निदान झाले, अशी माहिती ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी दिली.
या मुलाला नऊ दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्या सोबतच आवश्यक औषधे सुरू करण्यात आली. त्याच्यावर सलग १७ दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यानंतर आता त्याला वॉर्डमध्ये हलविण्यात आले. हा आजार साधारणतः पंधरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींमध्ये आढळतो.
- डॉ. आरती किणीकर, प्रमुख, ससून रुग्णालय बालरोग विभाग
पुणे शहरात आढळलेला ‘जेई’चा हा पहिला रुग्ण आहे. शहराच्या जवळ असणाऱ्या ग्रामीण भागात आतापर्यंत ‘जेई’चे रुग्ण सापडले आहेत. पण, शहरात आतापर्यंत रुग्ण आढळला नव्हते. ‘जेई’ हा गंभीर स्वरूपाचा दुर्मिळ आजार आहे. याचा प्रसार क्युलेक्स नावाच्या डासापासून होतो. याचे लसीकरण आतापर्यंत सुरू झाले नाही. देशाच्या काही भागात हे सुरू आहे. पुणे महापालिकेतही लवकरच याचे लसीकरण सुरू होणार आहे.
- डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका
महापालिकेने केलेल्या उपाययोजना
- रुग्ण आढळलेल्या परिसरातील तापाच्या रुग्णाचे सर्व्हेक्षण सुरू
- ताप आलेल्या १५ ते १६ रुग्णांच्या रक्ताचे नमुने ‘एनआयव्ही’कडे पाठविले
- परिसरातील एक हजार घरांचे सर्व्हेक्षण
- सर्व्हेक्षणासाठी २० वैद्यकीय पथके स्थापन
काय आहे ‘जेई’ आजार?
‘जेई’ हा विषाणूजन्य आजार आहे. तो क्युलेक्स विष्णोई या जातीच्या डासांपासून पसरतो. या रोगाचा प्रादूर्भाव विशेषतः लहान मुलांमध्ये आढळतो. हा विषाणू असलेल्या प्राण्याला या डासाची मादी चावल्यास ती दूषित होते. असा डास माणसाला चावल्यास या रोगाचा संसर्ग होतो.
प्रतिबंधक उपाय
‘जेई’ आजार लसीकरणामुळे प्रतिबंध करता येतो. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये याचे लसीकरण आतापर्यंत सुरू आहे. त्यात आता पुण्यासह रायगड आणि परभणी जिल्ह्यांची भर पडली आहे. पुणे शहरातील पंधरा वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना या अंतर्गत लस देण्याचे नियोजन करण्यात येत आहे.