
Yard Remodeling : यार्ड रिमॉडेलिंगचे काम २६ आठवड्यांतच
पुणे : पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग (फलाट विस्तारीकरण, सिग्नल यंत्रणा) यांचा कालावधी तब्बल १४ आठवड्यांनी कमी करण्यात आला आहे. याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे. यार्ड रिमॉडेलिंगच्या कामासाठी रेल्वेला ब्लॉक घ्यावा लागणार आहे. त्यामुळे पुणे स्थानकावरून धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित होणार आहे. आधी यासाठी ४० आठवड्यांचा कालावधी निश्चित केला होता.
मात्र आता तो २६ आठवड्यांवर आणण्यात आला आहे. कोणत्या गाड्या रद्द करायच्या हे ठरविण्यासाठी डीसीएन (विभागीय परिपत्रक सूचना) दहा दिवसांत बनेल. त्यानंतर येत्या एक ते दोन महिन्यांत प्रत्यक्षात कामास सुरुवात होणार असल्याची माहिती पुणे विभागाच्या नूतन विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यार्ड रिमॉडेलिंगचे काम सुरू करताच त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर होणार आहे. प्रवाशांची कमीत कमी गैरसोय व्हावी म्हणून रेल्वे प्रशासन दिवसातल्या ठरावीक वेळेतच हे काम करणार आहे. डीसीएन मध्ये कोणत्या गाड्या रद्द करायच्या, कोणत्या गाड्यांचा मार्ग बदलायचा, कोणत्या गाड्यांच्या सुरुवातीच्या स्थानकात बदल करायचा याबाबतचे नियोजन केले जाईल.
पुणे स्थानकावरचे काम जरी २६ आठवडे चालणार असले, तरीही ते सलग नसेल. ज्या दिवशी ब्लॉक असेल त्या वेळेत रेल्वे वाहतुकीवर परिणाम होईल. अन्यथा वाहतूक धिम्या गतीने सुरू राहणार आहे. या प्रसंगी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बी. के. सिंग, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला, वरिष्ठ विभागीय यांत्रिक व्यवस्थापक विजयसिंह दडस, जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर आदी उपस्थित होते.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणाल्या...
- हडपसर टर्मिनलचे काम गती शक्ती युनिट पूर्ण करणार. त्यासाठी आवश्यक त्या निधीची उपलब्धता. लवकरच सर्व सुविधा उपलब्ध करू.
- पुणे स्थानकावर पाच लिफ्ट बसणार. त्यापैकी चार ठिकाणची जागा निश्चित झाली. लवकरच लिफ्टच्या कामास सुरवात.
- नव्या पादचारी पुलास रॅम्पने जोडणार
- शिवाजीनगर लोकलच्या टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात. लोणावळ्यासाठीच्या लोकल शिवाजीनगर स्थानकावरून सुटणार.
- दौंड-पुणे दरम्यान धावणाऱ्या सर्व डेमूचे मेमूमध्ये रूपांतर झाल्यावर प्रवासी डब्यांची संख्येत वाढ.
- खडकी स्थानकावर टर्मिनलसाठी २९ कोटींचा खर्च अपेक्षित. सहा ते सात महिन्यांत काम पूर्ण होईल.
- पुणे स्थानकावर १६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार.
- पुणे विभागाला वंदे भारत एक्स्प्रेसचे दोन रेक मिळणार. मात्र ते कधीपर्यंत मिळतील हे निश्चित सांगता येणार नाही.
पुणे स्थानकाचे यार्ड रिमॉडेलिंग दृष्टिक्षेपात...
- २०१६-१७ मध्ये मिळाली मंजुरी
- ५२ कोटींचा खर्च अपेक्षित
- यंदाच्या अर्थसंकल्पात ३१ कोटींचा निधी मंजूर
- २६ आठवडे चालणार काम
पुणे स्थानकाची सद्यःस्थिती...
- दररोज प्रवास सुरू होणाऱ्या गाड्या : ७२
- १८ डबे असलेल्या गाड्या : ४२
- दररोज धावणाऱ्या गाड्या : २५०
- दररोजची प्रवासी संख्या : १ लाख ५० हजार
- लोकलच्या फेऱ्या : ४१