
Pune Metro : पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण
पुणे : ‘‘पुणे मेट्रोचे काम गतीने सुरु आहे. गरवारे महाविद्यालय ते सिव्हिल कोर्ट व फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट दरम्यानचे काम अंतिम टप्प्यात आहे. मार्च २०२३ पर्यंत मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल,’’ असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. हे काम पूर्ण होताच प्रवाशांना वनाज ते सिव्हिल कोर्ट व पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट या दरम्यान मेट्रोने प्रवास करता येणार आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी दुपारी पुणे मेट्रो प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी मेट्रोच्या वतीने सुरु असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. सुरवातीला त्यांनी शिवाजीनगर येथील भूमिगत मेट्रो स्थानकाची पाहणी केली. नंतर गरवारे महाविद्यालय स्थानकाची पाहणी केली. तसेच गरवारे महाविद्यालय ते वनाज असा मेट्रोने प्रवास केला. यावेळी आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आदी उपस्थित होते.
पुढचे टप्पेही गतीने पूर्ण होणार
मेट्रोचा पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होईल. त्या नंतर सिव्हिल कोर्ट ते रामवाडी हा दुसरा टप्पा व सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट हा तिसरा टप्पा देखील गतीने पूर्ण केला जाणार आहे. मेट्रोच्या विस्तारीकरणासाठी आणखी दोन टप्प्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यातील ८५ कि.मी. लांबीच्या मेट्रोचा प्रकल्प अहवाल पुणे महापालिका तयार करीत आहे. यावेळी मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी कामाचे संगणकीय सादरीकरण केले.