
करिअरला स्टार्टअपचे बुस्टर
पुणे, ता. ३ ः राज्यातील निम्म्याहून अधिक स्टार्टअप्स हे पुणे-मुंबई परिसरात असून, दिवसेंदिवस यात वाढ होत आहे. २०२१ मध्ये पुण्यातील एक हजारहून अधिक स्टार्टअप्सला मान्यता मिळाली. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीसाठी स्टार्टअप ही एक सुवर्णसंधी असून, अत्याधुनिक कौशल्य आत्मसात करण्याबरोबरच नवनिर्मितीचा आनंद आपल्याला मिळणार आहे. स्टार्टअप्समधील रोजगार संधींचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न...
स्टार्टअप म्हणजे काय?
नव्याने स्थापित केलेला व्यवसाय अथवा उद्योग, ज्याचे उत्पादन किंवा सेवा ही पूर्णतः नवीन असते. बहुतेक स्टार्टअप्स हे समविचारी लोकांनी एकत्र येत एखाद्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर काम करत सुरू झाले आहे.
स्टार्टअप युनिकॉर्न कधी बनतो?
जेव्हा एखादी कंपनी एका छोट्या मुल्यांकनाने सुरू होते व नंतर व्यवहारांत वाढ होत कंपनीचे मूल्यांकन एक अब्ज डॉलर्स किंवा त्याहून अधिक होते.
डेकाकॉर्नचा दर्जा
युनिकॉर्ननंतर, कंपनीचा डेकाकॉर्न बनण्याचा प्रवास सुरू होतो. जेव्हा कंपनी नफा कमावताना १० अब्ज डॉलरचे मूल्यांकन प्राप्त करते. तेव्हा ती कंपनी डेकाकॉर्न होतो. पेटीएम आणि बायजूला भारतात डेकाकॉर्नचा दर्जा आहे.
स्टार्टअप सुरू करताना
तुमची स्टार्टअप आयडिया पूर्णतः नवीन आणि युनिक असावी. आयटीतील असायलाच हवी असे नाही. पावभाजी विकणे हेही स्टार्टअप असू शकते. भांडवल कुणाचे? काम कोण करणार? कल्पना कोण साकारणार? विक्री कोण करणार? व्यवस्थापन कुणाकडे? या जबाबदारीची योग्य विभागणी करा. सोशल कॅपिटल उभारा. पॅशनने जगणाऱ्यांना एकत्र करा.
स्टार्टअपसाठी आवश्यक कौशल्ये ः
- वेळेचे योग्य नियोजन
- आकलन क्षमता
- संघभावना
- इंग्रजीत संभाषण कौशल्य
- सादरीकरणाचे कौशल्य
- ई-मेल लिहिण्याचे कौशल्य
संगणकाचे ज्ञान आवश्यक
संगणकाशी निगडित महत्त्वाची कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. ज्यात मायक्रोसॉफ्ट वर्ड किंवा गुगल डॉक्स, मायक्रोसॉफ्ट एक्सेल किंवा गुगल शीट्स, मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉईंट किंवा गुगल स्लाईड्स यांचा समावेश होतो.
पुण्यातील स्टार्टअप्सची क्षेत्रे
पुण्यात आरोग्य, जैवतंत्रज्ञान, अर्थ व बँकिंग सेवा, वाहनोद्योगाशी संबंधित स्टार्टअप्सची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान, कृषी, अन्नप्रक्रिया, शिक्षण, आशयनिर्मिती व प्रक्रिया या क्षेत्रातील स्टार्टअप्स पुणे परिसरात मोठ्या संख्येने कार्यरत आहेत.
स्टार्टअप्सची संख्या ः
जिल्हा - २०२० - २०२१
- पुणे - ७७५ - १०२२
- मुंबई शहर - ७४९ - १००१
- ठाणे - ३५० - ५२०
- नागपूर - १२४ - १६२
- नाशिक - ८२ - १२२
(स्रोत ः डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री ॲण्ड इंटर्नल ट्रेड)
राज्यातील नोंदणीकृत स्टार्टअप्स ः
२०१६ - ८६
२०१७ - १,०५८
२०१८ - १,६२०
२०१९ - २,१२९
२०२० - २,६८५
२०२१ - ३,७२१
२०२२ - २,२२०
सध्या स्टार्टअप्समध्ये नवीन नोकऱ्यांची संधी उपलब्ध होत आहे. या क्षेत्रात निरंतर शिक्षण अनिवार्य असून, प्रस्थापित कंपनीसारखा महिन्याला बॅंक खात्यावर पगार जमा होत नाही. मात्र, नवीन नोकरीच्या आणि बदलाच्या अनेक संधी तुम्हाला मिळू शकतात.
- प्रशांत गिरबाने, महासंचालक, एमसीसीआयए