साप आढळल्याने रेल्वे तिकीट केंद्र बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साप आढळल्याने रेल्वे तिकीट केंद्र बंद
साप आढळल्याने रेल्वे तिकीट केंद्र बंद

साप आढळल्याने रेल्वे तिकीट केंद्र बंद

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे स्थानकाच्या पाठीमागच्या बाजूस डीआरएम कार्यालयाजवळ तिकीट विक्री केंद्र सुरू केले. येथे जनरल तिकीट व प्लॅटफॉर्म तिकिटाची विक्री होते. मात्र, काही दिवसांपूर्वी येथे साप निघाल्याने येथील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी या केंद्रात कामास नकार दिला असून गेल्या महिन्यापासून हे केंद्र बंद आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोयही होत आहे.

डीआरएम ऑफिसच्या रस्त्यावरून येणाऱ्या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी स्थानकावरच्या तिकीट खिडकीवर येण्याची आवश्यकता लागू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने पादचारी पुलाजवळच तिकीट विक्री केंद्र सुरू केले होते. नोव्हेंबरमध्ये दुपारच्या वेळी एक साप तिथे निघाला. सापाला घाबरून कर्मचाऱ्यांनी तिथे काम करणार नसल्याचे सांगितल्याने रेल्वे प्रशासनाने हे तिकीट केंद्र अनिश्चित काळासाठी बंद केले.

ज्या डब्यांत तिकीट विक्री सुरू आहे त्या डब्याला अनेक मोठी छिद्रे आहेत. ते तत्काळ बुजविणे गरजेचे आहे. मात्र रेल्वे प्रशासन कर्मचाऱ्याचे कारण पुढे करीत ते केंद्रे चालू करण्यास टाळाटाळ करीत आहे. मात्र, याचा थेट फटका प्रवाशांना बसत आहे. प्रवाशांना चालू तिकीट काढण्यासाठी स्थानकाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या तिकीट केंद्रावर जाऊन थांबावे लागते. या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असल्याने तिकीट मिळण्यास वेळ खर्च होतो.

काही दिवसांपूर्वी या केंद्रात साप निघण्याची घटना घडली. त्यामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. येत्या काही दिवसांत हे केंद्र पूर्वीप्रमाणे सुरू होईल.
- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे

प्रवाशांसाठी सुरू झालेली सुविधा बंद होता कामा नये. तिकीट केंद्र बंद करण्याऐवजी ते केंद्र सुरक्षित जागी व प्रवाशांना सोयीच्या ठिकणी सुरू करावेत.
- निखिल काची, विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य, पुणे