
विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युस्किल्स् चॅम्पियनशिपचे आयोजन
पुणे, ता. ३ : शालेय अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा, तसेच संगणकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळण्यासाठी टिळक स्मारक मंदिर येथे शनिवारी (ता. १०) सकाळी साडेनऊ वाजता कॉम्प्युस्किल्स् चॅम्पियनशिप २०२२ चे आयोजन केले आहे.
स्पर्धेचे हे ११ वे वर्ष आहे. आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल, महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल), कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया (सीएसआय), टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) या कंपन्यांतर्फे तसेच रोटरी क्लब ऑफ पूना मिडटाऊन, युनियन बॅक ऑफ इंडिया, मास्टरकार्ड यांनी कॉम्प्युस्किल्स चॅम्पियनशिप या आंतरशालेय स्पर्धेचे आयोजन केले आहे.
यावर्षी पुणे महाराष्ट्रासह इतर राज्यातील साठहून अधिक शाळांच्या संघानी सहभाग नोंदविला आहे. या संघातून एक हजार ५२० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत अमेरिका येथील काही संघानी सहभाग नोंदविला आहे. तीन डिसेंबर रोजी आचार्य श्री विजय वल्लभ स्कूल येथे आयोजित उपांत्य फेरीतून अंतिम फेरीसाठी निवडले गेलेले संघ हे त्यांच्या प्रकल्पांचे प्रत्यक्ष सादरीकरण करणार आहेत. तोंडी प्रश्नाद्वारे त्यांच्यातील कौशल्य तपासले जाणार आहे. अंतिम फेरीनंतर पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुभाष परमार आणि मुख्याध्यापिका मानसी मारुलकर यांनी दिली.
-----