
जायका प्रकल्पातील अभियंत्यांच्या बदल्या रद्द
पुणे, ता.३ ः शहरातील नदी स्वच्छ करण्यासाठी व मैलापाण्याची समस्या सोडविण्यासाठी ‘मुळामुठा नदी सुधार प्रकल्पा’चे (जायका) प्रत्यक्षात काम झाल्यानंतर या कामाची जबाबदारी असलेल्या नऊ अभियंत्यांच्या अचानक बदल्या केल्याने कामात अडथळे निर्माण झाले होते. अखेर या बदल्या रद्द करून पूर्वीप्रमाणे काम सुरू ठेवण्याचे आदेश आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.
शहरात निर्माण होणारे मैलामिश्रित पाणी थेट नदीत जात असल्याने पर्यावरणाची हानी झाली आहे. हे प्रदूषण रोखण्यासाठी जायका कंपनीच्या अर्थसहाय्याने १४७३ कोटी रुपयांच्या मुळामुठा नदी सुधार प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. आतापर्यंत मलवाहिनी टाकण्याच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. नायडू, भैरोबा आणि धानोरी येथील मैलाशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. उर्वरित ठिकाणच्या कामाचे अंतिम आराखडे मंजूर झालेले आहेत. या कामावर देखरेख ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पुणे महापालिकेने ‘प्रकल्प अंमलबजावणी कक्ष’ (प्रोजेक्ट इंप्लिमेंटेशन युनिट- पीआययू) स्थापन केला आहे. त्यात ३३ अधिकाऱ्यांचा समावेश आहे, हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत यातील एकाही अधिकाऱ्यांची बदली करू नये, अपवादात्मक स्थितीत बदली केली तर त्यासाठी आयुक्तांची मान्यता घ्यावी असे आदेश २५ मार्च २०२२ रोजी आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले होते. या ३३ अधिकाऱ्यांची यादी केंद्र सरकारलाही पाठविण्यात आली आहे.
पण महापालिका प्रशासनाने या कक्षातील अभियंत्यांच्या परस्पर बदल्या केल्याने प्रकल्पाच्या कामात अडथळे निर्माण झाले. त्याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केले होते. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर आयुक्त विक्रम कुमार यांनी जायका प्रकल्प अंमलबजावणी कक्षातील अभियंत्यांच्या बदल्या रद्द करून त्यांना पुन्हा या कामात आणण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले. त्यानुसार बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांनी पुन्हा काम सुरू केले आहे.
आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, ‘‘जायका प्रकल्पाच्या कामातील ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या, त्या रद्द करण्यात आल्या आहेत. हे अभियंते पुन्हा विभागात काम करायला सुरवात केली आहे.