खासगी बसची पीएमपीला जोरदार धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासगी बसची पीएमपीला जोरदार धडक
खासगी बसची पीएमपीला जोरदार धडक

खासगी बसची पीएमपीला जोरदार धडक

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः हडपसर-स्वारगेट बीआरटी मार्गातून भरधाव जाणाऱ्या खासगी बसने पीएमपीए बसला समोरासमोर जोरदार धडक दिली. या अपघातात पीएमपी चालक, वाहकासह चौघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास रामटेकडी येथे घडली. या अपघातात दोन्ही बसच्या पुढील भागाचा चक्काचुर झाला.

पीएमपी चालक सुनील कोलते (वय ४०), वाहक संदीप जराड (वय ४५), खासगी बस चालक युसुफ शेख यांच्यासह चौघेजण या अपघातात जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पीएमपी बस शनिवारी पहाटे साडे चार वाजता स्वारगेटहून हडपसरला जात होती. बस रामटेकडी परिसरातील बीआरटी मार्गातून जात असताना विरुद्ध दिशेने निघालेल्या खासगी प्रवासी बसने पीएमपीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात पीएमपी बसचालक कोलते यांच्या पोटात स्टेअरिंगचा काही भाग शिरल्याने ते गंभीर जखमी झाले. तसेच वाहक जराड यांनाही गंभीर दुखापत झाली. यासह खासगी बसचा चालक युसुफ शेख हाही गंभीर जखमी झाला. अपघातानंतर वानवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिपक लगड यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने दोन्ही बस रस्त्याच्या बाजूला केल्या.

पीएमपी व खासगी बसची धडकून भीषण अपघात झाला. यात चौघेजण जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी दाखल करून बस रस्त्यातून बाजूला घेत रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
- दिपक लगड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वानवडी पोलिस ठाणे