
पुण्यात किमान तापमानात वाढ
पुणे, ता. ३ ः शहर आणि परिसरातील तापमानात चढ-उतार कायम असून गारठा काहीसा कमी होत आहे. शहरातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत २ अंशांनी वाढ झाली असून शनिवारी शहरात १४.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. तापमानातील चढ-उताराची स्थिती पुढील चार ते पाच दिवस अशीच कायम राहणार असून, गारठा काहीसा कमी होऊ शकतो, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला.
शहरात मागील दोन ते तीन दिवसांत पारा खाली घसल्याने थंडीचा कडाका जाणवू लागला होता. मात्र आता पारा पुन्हा हळू-हळू चढू लागला आहे. राज्यात ही सध्या अशीच परिस्थिती आहे. उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी पारा १० अंशांच्या खाली आहे. धुळे येथे ९.५ अंश सेल्सिअस तर निफाडमध्ये ९.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले.
सध्या मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा २ ते ५ अंशांनी वाढ झाली आहे. तर विदर्भात सरासरीच्या जवळपास तापामनाची नोंद होत आहे.
उत्तरेकडील राज्यांमध्येही गारठा कमी अधिक होत आहे असून राज्यात सध्या उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांच्या अभावामुळे किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. परिणामी थंडी ओसरली आहे. यातच दिवसा उन्हाचे चटके जाणवत आहेत. तर बंगालच्या उपसागरात दक्षिण अंदमान समुद्रात रविवारी (ता. ४) चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याची चिन्हे असून याच्या प्रभावामुळे या भागात सोमवारपर्यंत (ता. ५) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.