Pune PMPML ची प्रवाशांसाठी ‘आयटीएमएस’ सेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune PMPML
पीएमपीची प्रवाशांसाठी ‘आयटीएमएस’ सेवा

Pune PMPML ची प्रवाशांसाठी ‘आयटीएमएस’ सेवा

पुणे : गेल्या दोन ते तीन वर्षापासून बंद असलेली ‘इंटेलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम’ (आयटीएमएस) यंत्रणा पीएमपी पुन्हा सुरू करीत आहे. याअंतर्गत सुमारे १ हजार बसमध्ये ऑन बोर्ड युनिट (ओबीयु) बसविण्यात आले असून उर्वरित बसमध्येही ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. शिवाय पुणे व पिंपरी चिंचवडमधील बस थांब्यांचे डेटा गोळा करण्याचे कामही सुरू झाले आहे. याचा फायदा ‘आयटीएमएस’साठी होईल. ‘आयटीएमएस’ सुरू झाल्यावर बसचे लाइव्ह लोकेशन प्रवाशांना समजणार आहे.

प्रवाशांना प्रवास करताना पुढील थांबा कोणता असेल, बस कोणत्या थांब्यावर थांबत आहे, याची माहिती बसमध्येच डिस्प्ले बोर्डवर दिसेल. तसेच बसमध्ये ‘जीपीएस’ ऑन बोर्ड युनिट बसविले आहे. ही यंत्रणा मध्यवर्ती कार्यालयातील नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आली आहे.

यंत्रणेचा फायदा काय?
आयटीएमएस यंत्रणेमुळे कोणत्या मार्गावर किती प्रवासी होते, बसच्या एका फेरीचे उत्पन्न किती ही माहिती एका ‘क्‍लिक’वर उपलब्ध होईल. बसचा वेग, चालकाने कोणत्या बस थांब्यावर बस थांबवली हेही समजेल. त्यानुसार ‘पीएमपी’ला बसच्या वाहतुकीचे नियोजन करता येईल. प्रवासी संख्या कळण्यासही मदत होईल. त्यामुळे कोणत्या मार्गावर सेवा सुरू अथवा बंद ठेवायची याबाबतही पीएमपीला निर्णय घेणे सोपे होईल. पाच वर्षापूर्वी ५२ कोटी रुपये खर्चून ही यंत्रणा सुरू झाली होती. मात्र, मागच्या काही वर्षात ही यंत्रणा बंद होती. आता पुन्हा ही यंत्रणा सुरू होत आहे.

मग ‘गुगलच’ काय?
‘आयटीएमएस’ यंत्रणा सुरू झाल्यावर बसमधील प्रवाशांना व बस थांब्यावरील प्रवाशांना याचा थेट फायदा होईल. मात्र, बसचे लाइव्ह लोकेशन मोबाईलवर कळण्यासाठी ‘गुगल’ची मदत घेऊन ती यंत्रणा विकसित करणे गरजेचे आहे. तरच बसची माहिती प्रवाशांना मोबाईलवर मिळेल, तिकीट काढता येईल. दरम्यानच्या काळात तत्कालीन सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. चेतना केरुरे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. गुगलसोबत करार करून दिवाळीच्या काळात ही सेवा सुरूही होणार होती. मात्र त्यांची अचानक बदली झाली आणि गुगलला बगल मिळाली.

‘बीआरटी’द्वारे चाचणी
नव्याने ‘आयटीएमएस’चा प्रयोग राबविताना पीएमपी पहिल्यांदा त्याचा वापर ‘बीआरटी’मधून धावणाऱ्या बससाठी करणार आहे. ‘बीआरटी’ मार्गावरील बस थांब्याची स्थिती अन्य थांब्याच्या तुलनेने चांगले आहे. त्यामुळे येथे चाचणी घेणे सोपे होणार आहे. सध्या बस थांब्याची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

दृष्टिक्षेपात
पीएमपी बस संख्या - १,६५०
एकूण बस थांबे - ४,३००
शेड असलेले थांबे - १,२००
प्रवासी संख्या - सुमारे १२ लाख
प्रवासी उत्पन्न - सुमारे १ कोटी ४० लाख रुपये
एकूण मार्ग - ३७०
खासगी बससाठी मार्ग - १७५
एका बस शेडचा खर्च - ३ लाख रुपये.

‘आयटीएमएस’ सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ते सुरू करण्यापूर्वी बस थांब्याचा डेटा गोळा करणे व बसमध्ये ‘ओबीयू’ बसविण्याचे आदेश दिले आहे. सर्व बसमध्ये ‘ओबीयू’ बसविल्याने प्रवासी सेवा सुधारेल.

- डॉ. ओमप्रकाश बकोरिया, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे