Swasthyam 2022 : डॉ. कुमार विश्वास करणार ‘सकाळ स्वास्थ्यम’चे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swasthyam 2022
डॉ. कुमार विश्वास करणार ‘सकाळ स्वास्थ्यम’चे उद्‍घाटन

Swasthyam 2022 : डॉ. कुमार विश्वास करणार ‘सकाळ स्वास्थ्यम’चे उद्‍घाटन

पुणे : प्रेम, नाते-संबंध, समाजकारण- राजकारणाच्या सद्यःस्थितीवर कवितांच्या माध्यमातून नेमके बोट ठेवणारे आणि युवकांमध्ये कमालीचे लोकप्रिय असलेले प्रख्यात कवी आणि खुमासदार वक्ते म्हणून देशभर ओळख असलेल्या डॉ. कुमार विश्वास यांच्या हस्ते ‘सकाळ स्वास्थ्यम’चे उद्‍घाटन येत्या शुक्रवारी (ता. ९) होणार आहे. शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.

त्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन नागरिकांना मिळणार आहे.
‘सोहळा स्वास्थ्याचा, जागर आरोग्याचा’ या उपक्रमातून आनंदी जीवनाचे धडे नागरिकांना सलग तीन दिवस (९, १० आणि ११ डिसेंबर) मिळणार आहे. ‘सकाळ स्वास्थ्यम’च्या उद्‍घाटनाचा सोहळा शुक्रवारी (ता.९) सायंकाळी सहा वाजता स्वारगेटजवळील गणेश कला-क्रीडा मंच येथे होणार आहे. डॉ. कुमार विश्वास यांच्या हस्ते त्याचे उद्‍घाटन झाल्यावर ‘दैनंदिन जीवन समृद्ध करण्यासाठी रामायण आणि महाभारतातील शिकवण’ या विषयावर त्यांचे व्याख्यान होणार आहे.

‘कोई दिवाना कहता है’, ‘हुनर बोलते है’, ‘जवानी में कई गझलें’, ‘तुम अपना कहती थी’ या डॉ. विश्वास यांच्या कविता प्रचंड गाजल्या असून सोशल मीडियावर त्यांना लाखो फॉलोअर्स आहेत. ‘रो लिए तुम बिन’ या त्यांच्या कवितेला तब्बल ५४ लाख नागरिकांनी पसंती दर्शविली आहे. युवकांमध्ये त्यांची मोठी क्रेझ असून आबालवृद्धांचीही त्यांना पसंती आहे.

समाजकारण, राजकारण या विषयावरही डॉ. विश्वास यांची खुमासदार व अनोख्या शैलीतील फटकेबाजी देशातील विविध शहरांतील नागरिकांना भावली आहे. राजकीय नेते म्हणूनही परिचित असलेले डॉ. कुमार विश्वास गुजरात निवडणुकीच्या धामधुमीतून खास वेळ काढून ‘सकाळ स्वास्थ्यम’च्या उदघाटनासाठी पुण्यात येत आहेत. त्या प्रसंगी त्यांचे होणारे व्याख्यान हे पुणेकरांसाठी पर्वणी ठरणार आहे.

- ‘सकाळ स्वास्थ्यम’ उपक्रमाविषयी विशेष पान.... टुडेमध्ये
- ‘सकाळ स्वास्थ्यम’मधील कार्यक्रमांविषयी सविस्तर माहिती....