त्रासाला कंटाळून रेल्वेचालक गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्रासाला कंटाळून रेल्वेचालक गायब
त्रासाला कंटाळून रेल्वेचालक गायब

त्रासाला कंटाळून रेल्वेचालक गायब

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः रेल्वे बोर्डच्या नियमानुसार नऊ तास ड्यूटी पूर्ण करणाऱ्या चालकाला तत्काळ विश्रांती देणे बंधनकारक आहे. मात्र मालगाडीच्या चालकाने नऊ तास ड्यूटी केल्यावर त्यांना पुन्हा लोणी ते घोरपडी दरम्यान मालगाडी चालविण्याचे आदेश देण्यात आला. याला नकार देताच तत्काळ वरिष्ठांनी मिरज स्थानकावर बदली केली. शिवाय शिवीगाळ देखील केली. परिणामी हरिश्चंद्र जी. अंकुश हे तीन दिवसांपासून घर सोडून निघून गेले असून त्यांना रेल्वेतील मॅकेनिकल विभागाचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्यांची पत्नी सुवर्णा अंकुश यांनी ‘सकाळ’ शी बोलताना केला. अंकुश हे पुणे विभागातील मालगाडीचे चालक आहेत. घोरपडी येथे त्यांचे मुख्यालय आहे.

काय आहे प्रकरण?
- शुक्रवारी हरिश्चंद्र जी. अंकुश यांना लोणावळा येथून लोणी काळभोरसाठी मालगाडी आणायची होती
- यासाठी त्यांना सात तासांचा अवधी लागला
- दोन तास शिल्लक राहिले असताना त्यांनी लोणी काळभोरच्या स्थानक व्यवस्थापकांना ड्यूटी संपत असल्याचे सांगून तसा मेमो देखील दिला
- त्यानंतर ती मालगाडीची प्लेसमेंट देखील केली
- पुन्हा ती मालगाडी धावण्यासाठी तयार केली
- यासाठी जवळपास २४ प्रकारच्या तपासणी कराव्या लागतात
- यात दोन तास गेले
- कामाचे नऊ तास पूर्ण झाल्यावर अंकुश पुण्याला निघाले
- तेव्हा त्यांना पुन्हा लोणी काळभोर ते घोरपडी अशी मालगाडी चालविण्यास सांगितले
- त्याला नकार देताच वरिष्ठांनी मोबाईलवर शिवीगाळ केल्याचा आरोप पत्नी सुवर्णा अंकुश यांनी केला

अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
तीन डिसेंबर रोजी सकाळी घरी असताना हरिश्चंद्र अंकुश यांना मोबाईल वर पुन्हा वरिष्ठांचा कॉल आला. यात त्यांना त्यांची बदली मिरज येथे झाली असून तत्काळ मिरजला रिपोर्ट करण्यास सांगितले. हे ऐकताच ते खचले आणि डीआरएम ऑफिसलाला जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. यावेळी एनआरएमयूचे सुनील बाजारे, बापू बराटे यांच्यासह सुमारे दोनशे रेल्वे चालक उपस्थित होते. यावेळी डीआरएमना भेटून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

रेल्वे चालकांना वारंवार वरिष्ठांकडून त्रास दिला जातो. वेळेवर ना सुट्टी मिळते, ना विश्रांती. आता तर आम्हाला अर्वाच्य भाषेत बोलले जात आहे. कामाचा आधीच खूप ताण आहे. त्यात वरिष्ठांचे असे बोलणे एकूण आमची मानसिकता खराब होत आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे. येत्या ४८ तासांत जर संबंधित चालक परत आला नाही तर आम्ही पुणे विभागातून एकही मालगाडी जाऊ देणार नाही.
- मनीष मिश्रा, ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन, पुणे

चालकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडविण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल; मात्र सद्यःस्थितीत बेपत्ता असलेला चालक परत येणे गरजेचे आहे. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कारवाई केली जाईल.
- इंदू राणी दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे