मुलाखत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलाखत
मुलाखत

मुलाखत

sakal_logo
By

स्वास्थ्यम् पानासाठी
-----
नाद योगातून आरोग्याची देखभाल
प्रत्येक व्यक्तीने दररोज फक्त एक तास स्वतःसाठी देणे महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनाचा उद्देश काय, आपली ओळख काय अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे स्वतःच शोधण्याचा प्रयत्न करा. अंतरंगाशी संवाद साधण्यासाठी नाद योग किंवा संगीत साधना उपचार पद्धती (साउंड थेरपी) महत्त्वाची भूमिका निभावते. या ध्यानामुळे मिळणारी शांतता आणि त्याचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम, याचे महत्त्व हळूहळू लोकांना पटू लागले आहे. मी नाद योग पद्धतीने आरोग्याची देखभाल कशी घेता येईल, याची अनुभूती लोकांना ‘स्वास्थ्यम्’मध्ये करून देणार आहे.
- प्रियांका पटेल, संस्थापक, साउंड हीलिंग इंडिया
----
शास्त्रीय संगीत शिकण्यापासून ते नाद योगिनी होण्यापर्यंतचा माझा प्रवास संगीतमय पद्धतीनेच घडला. संगीतामुळेच माझी ओळख निर्माण झाली. वयाच्या अकराव्या वर्षी शास्त्रीय संगीताचा अभ्यास सुरू केला. माझे गुरू नेहमी मला चित्त स्थिर ठेवण्यास सांगत. त्यावेळी याचा अर्थ समजला नाही, पण काळानुसार ध्वनीच्या कंपनांमुळे येणाऱ्या अनुभवातून चित्त स्थिर करण्याची समज आली. लग्न झाल्यानंतर २०१०पासून ‘साउंड थेरपी’कडे प्रवास सुरू झाला. तेव्हा ही एक उपचार पद्धत आहे, ही कल्पना सामन्यांमध्ये रुजलेली नव्हती. मी साउंड थेरपीसाठी वापरले जाणाऱ्या ‘बाऊल’चे छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करू लागले, तेव्हा अनेकांना प्रश्‍न पडायचा, नेमके या ‘बाऊल’मधून येणाऱ्या ध्वनीचा काय उपयोग असतो? ‘सिंगिंग बाऊल’ची संकल्पना ही त्यावेळी नवीनच होती. मात्र, आता बऱ्यापैकी लोकांना याबाबत माहिती आहे. २०१६पासून संगीतसाधना करीत आहे. जीवनशैलीत संगीताचा अंतर्भाव करण्यास लोकांना प्रोत्साहन दिल्यानंतरच मी संगीताचा वापर हीलिंग पद्धतीसाठी केला.

मानसिक, भावनिक आरोग्य
आपल्या संस्कृतीत सर्वांत महत्त्वाचा खजिना म्हणजेच योग. योगामध्ये प्राणायाम, मुद्रा, आसने शिकविले जाते. प्रत्येक आसनात आठ नियमांचे पालन करण्यास शिकविले जाते. या आठ नियमांचे पालन केल्यास केवळ शारीरिक नाही, तर मन आणि चित्त देखील स्थिरावर येऊ शकते. जसे शारीरिक आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, त्याच प्रमाणे मानसिक व भावनिक आरोग्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. मानसिक आरोग्याबाबत आपल्या समाजात अद्याप गैरसमज आहेत. मूळात मानसिक आरोग्याशी निगडित समस्या उद्भवली आहे हेच अनेकजण मान्य करत नाहीत. त्यात मानसिक स्वास्थ्याची समस्या वाढत गेल्यास याच्या उपचारासाठी मानसोपचार तज्ज्ञ, थेरपिस्ट यांच्याकडे जाण्यास टाळतात. याचे मुख्य कारण समाजाची भीती. काहींना आपल्या समस्या दुसऱ्यांना सांगण्याची भीती असते. यामुळे लोकांना समोर ते कमकुवत दिसू लागतील, अशी भावना त्यांच्यात निर्माण होते. मात्र, हे पूर्णतः चुकीचेही नाही. असे कोठेही लिहले नाही की प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट यायला हवी, तसेच आयुष्यातील प्रत्येक समस्येचे निवारण करताच आले पाहिजे. मानसिक आरोग्य ही एक गंभीर समस्या आहे व त्याच्याशी निगडित उपचार वेळेतच होणे गरजेचे आहे. यातून बाहेर पडण्यासाठी थेरपिस्ट किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत तितकीच उपयुक्त व महत्त्वाची ठरते.

भारतीय संस्कृतीची झलक
योगमध्ये भारताची संस्कृती दिसून येते. त्यामुळे जगाचा योगासनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजेच आपल्या संस्कृतीची झलक त्यातून अनुभवणे. या संस्कृतीमुळे आपल्याला आरोग्याचे संतुलन राखणे शक्य होते. या गोष्टी प्रकर्षाने योग, साधनेत दिसून येतात. याचा प्रभाव जागतिक स्तरावर असून, आज पाश्चात्त्य देशांमध्ये ही आपल्या संस्कृतीचा अर्थात या योग-साधनेला प्राधान्य दिले जाते. सध्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. याचा परिणाम आपल्या दैनंदिन कामावरही दिसून येतो. कामाचा ताण, खाण्या-पिण्याची सवयी, झोपण्याच्या वेळा, व्यायाम यामुळे आरोग्याचे संतुलन बिघडत जात आहे. परिणामी, डिप्रेशन, इन्सोम्निआ, अति विचार, उच्च रक्तदाब, रक्तातील साखर वाढणे अशा कित्येक आरोग्याच्या समस्या कमी अनेकांना उद्भवू लागले आहेत.
आरोग्यच सुस्थितीत नसेल, तर मग अशा पद्धती कमविण्‍यात आलेल्या पैशांचे करणार काय? हा विचार प्रत्येकानी करायला हवा. जीवनाचा आनंद खऱ्या अर्थाने लुटायचा असल्यास त्याला एक योग्य
दिशा आणि संतुलित प्रमाणात दैनंदिन क्रिया यावर भर दिला पाहिजे. तसेच योग प्राणायाम, नाद योगाच्या माध्यमातून संतुलित जीवनशैलीला आत्मसात करणे शक्य आहे.

‘स्वास्थ्यम्’मधून संगीत साधना
प्रत्येक व्यक्ती ध्वनी घेऊन जन्माला येतो. विशेष म्हणजे, ही भावना आपण गर्भाशयात विकसित करतो. त्यामुळे नाद योग किंवा संगीताच्या माध्यमातून जीवन जगण्याची एक नवी दिशा देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती करण्याचा ध्येय आहे. ‘स्वास्थ्यम्’च्या माध्यमातून संगीत दुनियेत पाऊल ठेवून बाह्य ध्वनींच्या माध्यमातून आपल्या अंतरंगातील ध्वनीशी समन्वय साधणार आहोत. ही पद्धत सोपी असली तरी यातून लोकांना खास अनुभव मिळणार आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने आपल्या व्यक्तिमत्त्वाची ओळख व जगण्याची दिशा मिळेल. त्यामुळे या अनुभवांची सफरच प्रत्येकानी समजून घ्यावी. ध्वनीच्या माध्यमातून आपण कसे जोडले जातो, त्याचा आरोग्याशी कसा संबंध असतो, त्याचा फायदा काय अशा अनेक पैलूंना उलगडण्याचा प्रयत्न यातून केला जाईल. याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ‘स्वास्थ्यम्’मध्ये सहभागी व्हा.
----
(शब्दांकन ः अक्षता पवार)
---------