बालकुमार साहित्य संस्थेच्या शाखांचे बंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालकुमार साहित्य संस्थेच्या शाखांचे बंड
बालकुमार साहित्य संस्थेच्या शाखांचे बंड

बालकुमार साहित्य संस्थेच्या शाखांचे बंड

sakal_logo
By

पुणे, ता. ५ ः अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या सभेत झालेल्या गदारोळाचे पडसाद सोमवारी उमटले. संस्थेच्या निवडणुकीत शाखेच्या आजीव सदस्यांना मतदानाचा अधिकारच नाकारल्याने नाराज सदस्यांनी बंडाचे निशाण फडकावले. तसेच या शाखांनी नव्या छताखाली एकत्र येत स्वतंत्र चूल मांडण्याचीही तयारी केली आहे.
बालकुमार साहित्य संस्थेची सर्वसाधारण सभा रविवारी (ता. ४) पार पडली. या सभेत राबवण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया बेकायदा असल्याचा आरोप काही सदस्यांनी केला. या दरम्यान संस्थेच्या काही शाखांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आल्यामुळे त्या शाखांच्या पदाधिकाऱ्यांसह सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. आता माधव राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वात्मक मराठी बालसाहित्य महामंडळ, महाराष्ट्र, पुणे या राज्यव्यापी संस्थेची घटकसंस्था अथवा संलग्न संस्था म्हणून काम करण्याचा निर्णय काही शाखांनी घेतला आहे.
संस्थेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला तरी त्यातच नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. त्यावर आक्षेप घेत काही सदस्यांनी धर्मादाय आयुक्तांकडेही तक्रार करणार असल्याचा पवित्रा घेतला आहे. आता शाखांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याने संस्थेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

सध्याच्या कार्यकारिणीची मुदत संपल्यामुळे नियमानुसार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून निवडणुकीच्या माध्यमातून नवीन कार्यकारिणी स्थापित करावी, असा माझा आग्रह होता. संस्थेने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला; परंतु प्रत्यक्षात विहित पद्धतीने निवडणूक झाली नाही. आत्ता निवडून आलेली कार्यकारिणी अवैध आहे. अनेक मतदारांना मतदार यादीतून वगळण्यात आले. शाखांना मतदानाचा अधिकार दिला गेला नाही, त्यामुळे शाखेच्या सदस्यांनी मूळ संस्थेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला, तो योग्यच आहे.
- माधव राजगुरू, माजी उपाध्यक्ष, बालकुमार साहित्य संस्था

अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेत शाखांना सापत्न वागणूक दिली जात होती. शाखा आपल्या नाहीतच, अशा आविर्भावातून आमच्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे संस्थेशी संलग्नतेबाबत आम्ही पुनर्विचार करत आहोत. संस्थेशी फारकत घेण्याबाबत आमची चर्चा झाली असून त्याबाबतच अधिकृत निर्णय बैठकीनंतर जाहीर करू.
- विनोद सिनकर, सचिव, औरंगाबाद शाखा