
‘अँटीजेन टेस्ट’ गैरव्यवहार चौकशी संपेना
पुणे, ता. ५ : कोरोना काळात नागरिकांची चाचणी करण्यासाठी खरेदी केलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्ट कीटमध्ये गैरव्यवहार झाल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. त्याची सप्टेंबर महिन्यापासून सुरू झालेली चौकशी अद्यापही संपलेली नाही. मात्र यावर आता सारवासारव करत येत्या आठवडाभरात अहवाल प्राप्त होईल, असा दावा आरोग्यप्रमुख डॉ. आशिष भारती यांनी केला आहे.
महापालिकेच्या वारजे येथील अरविंद बारटक्के दवाखान्यात जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत रॅपिड अँटिजेन टेस्ट कीट खासगी लॅबला विकल्याचा आरोप महापालिकेच्या एका निलंबित डॉक्टरकडून करण्यात आला होता. त्यासंदर्भात रीतसर वारजे पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत चौकशी केली. त्यात गैरव्यवहार झाल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आल्याने या प्रकरणाची चौकशी करावी, असे पत्र पोलिसांनी सप्टेंबर २०२२ मध्ये महापालिकेला दिले. दरम्यान, दोन अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठित करण्यात आली.
सप्टेंबर महिन्यात या गैरव्यवहाराची कुणकूण कोणालाही लागू देण्यात आली नाही. खुद्द अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनादेखील या प्रकरणाची माहिती तीन दिवसांपूर्वी मिळाली. आरोग्य विभागातील अंतर्गत वाद, कर्मचाऱ्यांवर केली जाणारी कारवाई याची माहिती वारंवर वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली जात असताना या प्रकरणाबाबत मात्र त्यांनाच अंधारात ठेवण्यात आले.
पोलिसांचे पत्र येण्यापूर्वीच दोन अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. त्याचा अहवाल येत्या आठवड्यात प्राप्त होईल. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. ही चौकशी करताना त्यात मुदतीचा उल्लेख नव्हता. लवकरात लवकर चौकशी करून अहवाल सादर करावा, असे सांगितले होते.
आशिष भारती, आरोग्यप्रमुख
या प्रकरणाची माहितीच मला शनिवारी कळाली आहे. या प्रकरणात पूर्वीच चौकशी समिती नेमली आहे. त्यामुळे आता वेगळी समिती नेमलेली नाही. पण या समितीचा अहवाल योग्य नसल्यास त्रयस्थ संस्थेमार्फत पुन्हा चौकशी केली जाईल.
- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त