दातांच्या काळजीसाठी ‘दोस्त’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दातांच्या काळजीसाठी ‘दोस्त’!
दातांच्या काळजीसाठी ‘दोस्त’!

दातांच्या काळजीसाठी ‘दोस्त’!

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : कोणताही आजार झाला किंवा त्याची लक्षणे दिसायला लागली की डॉक्टरकडे जायचे आणि उपचार घ्यायचे अशी पद्धत रुढ आहे; मात्र जर आजार होण्यापूर्वीच तो लक्षात आला तर त्यामुळे होणार त्रास, उपचारासाठी लागणारे पैसे आणि या सर्वांत जणारा वेळ देखील वाचतो. दातांच्या बाबतीत बऱ्याचदा असेच घडते. शरीरातील अतिशय महत्त्वाचा अवयव असलेल्या दातांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. पण आता दातांसाठी एक ‘दोस्त’ आला आहे.
दंत चिकित्सक असलेल्या विधी भानुशाली-कबाडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टीफीशयस इंटीलिजेसन्स) माध्यमातून एका स्टार्टअपची सुरवात केली आहे. हे स्टार्टअप घरच्या घरीच मोबार्इल वापरून दात तपासण्याची सुविधा पुरवते. डेंटलदोस्त (DentalDost) या स्टार्टपच्या ॲपचा वापर करून दाताचा फोटो काढल्यानंतर तुमच्या दातांची सद्यःस्थिती नेमकी काय आहे हे सांगते. त्यानंतर दातांच्या स्थितीवरून नेमके काय उपचार करावे हे टेस्ट करणाऱ्याला समजते.

२०१८ पासून संशोधन
विधी भानुशाली-कबाडे आणि त्यांचे पती रजत कबाडे यांनी ऑगस्ट २०२१ मध्ये या स्टार्टअपची स्थापना केली. विधी कबाडे या दंतवैद्य आहेत. रजत कबाडे हे अभियंता आहेत. या कल्पनेवर २०१८ पासून त्यांनी संशोधन सुरू केले होते. २०१९ मध्ये त्यांनी दातांच्या बाबत माहिती देणारी २४ तास सुरू असलेली हेल्पलाइन सेवा स्थापन केली. स्टार्टअपने आतापर्यंत २५० पेक्षा अधिक शिबिरांद्वारे नागरिकांमध्ये दातांच्या काळजीबाबत जागरूकता केली आहे. त्यामाध्यमातून त्यांनी दोन लाखपेक्षा अधिक नागरिकांच्या दातांचा फोटोचे संकलित केले आहे. त्यांचा वापर आजारांचे विश्लेषण करण्यासाठी करण्यात आला आहे.

काय आहेत वैशिष्ट्ये?
- ॲपमधील मशिन लर्निंगद्वा‍रे तोंडातील रोगांची माहिती मिळते
- आजाराची माहिती झाल्यामुळे भविष्यात वेदना, वेळ आणि पैसा वाचवता येतो
- देशातील ७५ टक्के मौखिक रोग कमी होण्यास मदत होर्इल
- नागरिकांना दातांच्या रोगांविषयी प्रतिबंधात्मक उपाय करता येतील
- तोंडाचा कर्करोग कोणत्या टप्प्यात आहे आणि त्यावरील उपचारासंबंधी जागरूकता वाढेल
- दातांच्या शस्त्रक्रियेबद्दल असलेली भीती कमी करणे

असे काम करते ॲप्लिकेशन
- सुरवातीला तुमच्या दातांचे स्कॅनिंग (समोरील दात, हिरड्यांचा भाग, खालचे दात) तीन टप्प्यांमध्ये करणे
- दातांची स्थिती कशी तसेच असलेल्या समस्येची माहिती स्कॅन केलेल्या छायाचित्रासोबत दिसते
- दातांच्या प्रकारानुसार त्याचे रिपोर्ट काही क्षणांत उपलब्ध होतात
- व्हिडिओ कॉलद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेऊन पुढील उपचार करता येवू शकता

असे आहेत तोंडाचे प्रकार
१ पोकळी प्रवण : ज्या तोंडात दात बहुतेक वेळा किडलेले असतात, काहीवेळा काळजी घेतल्यानंतरही ते किडतात
२ कोरडेपणा : लाळेच्या कमतरतेमुळे नेहमीच कोरडेपणा जाणवतो
३ संवेदनशील : गरम किंवा थंड अन्न खाताना किंवा थंड वाऱ्यामुळे तोंडात निर्माण होणारी संवेदनशीलता
४ रक्तस्राव : दात घासताना किंवा खाताना हिरड्यांमधून रक्त येणे
५ कृत्रिम अवयवांचा (प्रोस्थेटिक) : तोंडात दोनपेक्षा जास्त कॅप किंवा ब्रिज असणे
६ वेडेवाकडे दात (Mal-aligned) : दात सरळ रेषेत नसल्याने दात आणि जबड्याचा आकार संतुलित नसणे

तोंडाचे आजार आणि कर्करोग टाळायचा असेल तर वेळेत आजाराचे निदान होणे हा एकच मार्ग आहे. या संकल्पनेवर काम करीत स्थानिक
ते जागतिक स्तरापर्यंतच्या लोकांपर्यंत ही सुविधा पोचविणे हा या स्टार्टअपचा हेतू आहे.
- डॉ. विधी भानुशाली-कबाडे, संस्थापक, डेंटल दोस्त