अस्सल इंद्रायणी तांदूळ महोत्सवाचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अस्सल इंद्रायणी तांदूळ महोत्सवाचे आयोजन
अस्सल इंद्रायणी तांदूळ महोत्सवाचे आयोजन

अस्सल इंद्रायणी तांदूळ महोत्सवाचे आयोजन

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : मावळातील शेतकऱ्यांनी एकत्र येत स्थापन केलेल्या मावळ ॲग्रोने सोमवारपासून (ता. १२) अस्सल इंद्रायणी तांदूळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. पाच, दहा आणि ३० किलोच्या पॅकेजमध्ये हा तांदूळ उपलब्ध होणार असून ५५ रुपये प्रतिकिलो या दराने तो विक्रीसाठी असणार आहे. मार्केट यार्ड येथील भाजीपाला बाजाराच्या प्रवेशाद्वाराजवळ या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने सहकारी तत्त्वावर तांदळाचे उत्पादन करून अशा प्रकारे विक्री करणारा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. मावळ ॲग्रोचे संस्थापक अध्यक्ष माऊली दाभाडे, बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे, संचालक रमेश थोरात आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रभारी) विजय टापरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
दाभाडे म्हणाले, ‘‘अस्सल इंद्रायणी तांदूळ ग्राहकांना मिळावा, यासाठी मावळ तालुक्यातील ५५ विकास सोसायट्यांच्या माध्यमातून भाताची पेंडी विकत घेण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी बँकेकडून पाच कोटी रुपयांचे कर्ज या विकास सोसायट्यांच्या माध्यमातून दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा प्रतिक्विंटल (हमीभावापेक्षा) जादा दर देऊन भाताच्या पेंढ्या विकत घेतल्या. त्यावर सर्व प्रक्रिया करून तांदळाची निर्मिती केली. माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून तांदूळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. तांदूळ विक्रीतून जो नफा मिळणार आहे, तो लाभांश स्वरूपात शेतकऱ्यांना वाटप करणार आहे.’’
प्रा. दुर्गाडे म्हणाले, ‘‘भात पिकासाठी प्रथम अशा प्रकारे बँकेकडून १० टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले आहे. तांदळाची विक्री झाल्यानंतर आलेल्या पैशातून सोसायट्या कर्जाची परतफेड करणार आहेत. प्रथमच बँकेकडून अशा प्रकाराचा प्रयोग राबविण्यात आला आहे.’’