
तळजाई, वडगाव, धायरीत वृक्षारोपण
पुणे, ता. ७ : पर्यावरणाचे संवर्धन आणि नागरिकांचे अस्तित्व सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशातून ‘एम. एम. पॉलिटेक्निक पिंपरी-चिंचवड’, ‘डू सेव्ह फाउंडेशन आणि ‘वन विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने तळजाई, वडगाव, धायरी येथे विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आल्याची माहिती प्राचार्या गीता जोशी यांनी दिली. पुणे वन विभागाच्या स्वच्छ टेकड्या मोहीम अंतर्गत टेकडीवरील प्लास्टिक आणि इतर कोरडा कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. वैयक्तिक पातळीवर कचरा व्यवस्थापन आणि रक्तदान संकल्प हे उपक्रमदेखील यानिमित्ताने पार पडले. ‘एम. एम. पॉलिटेक्निक’चे विद्यार्थी तसेच शिक्षक यांनी त्यात हिरिरीने भाग घेऊन योगदान दिले. या उपक्रमासाठी ‘डू सेव्ह फाउंडेशन’च्या निर्मला थोरमोटे आणि अनिकेत थोरमोटे यांनी मार्गदर्शन केले. वन विभागाचे महादेव चव्हाण यांनीदेखील सहकार्य केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. एस. व्ही. कुलकर्णी, प्रा. पी. ए. घुगे आणि जे. एस. झांबरे यांनी विशेष प्रयत्न केले. उपक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याबाबत संस्थेचे कार्याध्यक्ष बी. जी. जाधव यांनी सर्वांचे अभिनंदन केले.