वर्णनात्मक परीक्षेविरोधात उमेदवार आक्रमक एमपीएससीच्या उमेदवारांचा १९ डिसेंबरला आंदोलनाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्णनात्मक परीक्षेविरोधात उमेदवार आक्रमक   
एमपीएससीच्या उमेदवारांचा १९ डिसेंबरला आंदोलनाचा इशारा
वर्णनात्मक परीक्षेविरोधात उमेदवार आक्रमक एमपीएससीच्या उमेदवारांचा १९ डिसेंबरला आंदोलनाचा इशारा

वर्णनात्मक परीक्षेविरोधात उमेदवार आक्रमक एमपीएससीच्या उमेदवारांचा १९ डिसेंबरला आंदोलनाचा इशारा

sakal_logo
By

पुणे, ता. ७ : राज्यसेवेच्या वर्णनात्मक परीक्षापद्धतीच्या विरोधात उमेदवारांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, १९ डिसेंबरला आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्य सेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या धोरणाची अंमलबजावणी २०२३ मध्ये केली जाणार असल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हा निर्णय २०२५ पासून लागू करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

एकीकडे विद्यार्थ्यांच्या मोठ्या गटाने या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. तर दुसरीकडे या निर्णयामुळे यूपीएससीत मराठी टक्का वाढेल, असे समर्थन काही विद्यार्थी करत आहे. एमपीएससीच्या राज्यसेवेचा अभ्यास करणारा राजेश सांगतो, ‘‘कोरोनामुळे अडीच वर्षे वाया गेली आहेत. त्यात यावर्षीच्या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या पदांसह गट ‘अ’ पदांच्या जागा आल्या नाहीत. त्‍यात आता एमपीएससीने मुख्य परीक्षा वर्णनात्मक करण्याचा निर्णय घेतला आहे. तो चांगला असता, तरी तो लगेचच लागू करू नये. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.’’

निर्णयाबद्दल विद्यार्थी म्हणतात...
- विद्यार्थ्यांना वर्णनात्मक लिहिण्याचा सराव करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यामुळे यूपीएससीच्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल.
- जे विद्यार्थी गेल्या दोन ते चार वर्षांपासून मुख्य परीक्षेचा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने अभ्यास करत आहेत, त्यांना लगेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) विद्यार्थ्यांशी स्पर्धा करावी लागेल.
- लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी किमान दोन वर्षे तरी वेळ लागण्याची शक्यता आहे.
- २०२३ च्या मुख्य परीक्षेची तयारी करण्यासाठी फक्त चार ते पाच महिन्यांचा कालावधी असून, तो पुरेसा नाही.

राज्यसेवा २०२२ ची मुख्य परीक्षा जानेवारी २०२३ ला संपेल. मग चार महिन्यांनी पुन्हा राज्यसेवा २०२३ ची पूर्व परीक्षा आहे. अशा परिस्थितीत मुख्य परीक्षेच्या संपूर्ण बदललेल्या अभ्यासक्रमाचा अभ्यास कधी करायचा?
- सुप्रिया

आयोगाने घेतलेला निर्णय योग्य आहे. कारण बदल ही काळाची गरज आहे. मात्र, विद्यार्थ्यांना तयारीसाठी वेळ हवा आहे. म्हणून या बदलाची अंमलबजावणी २०२५ पासून करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या भावना एमपीएससीने समजून घेण्याची गरज आहे.
- भावना

राज्यसेवा लेखी परीक्षा पद्धती २०२५ नंतर लागू करावी आणि आता २०२३ च्या जाहिरातीत उपजिल्हाधिकारी, तहसीलदार आदी गट ‘अ’ च्या सर्व पदांचा समावेश असावा.
- राहुल