
पुणे विभागातील लोको पायलट ‘जीएम’ पुरस्काराने सन्मानित
पुणे, ता. ७ ः पुणे रेल्वे विभागातील लोको पायलट (चालक) कोमल असटकर यांना मध्य रेल्वेचा मानाचा समजला जाणारा ‘जीएम’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या हस्ते मुंबई येथे आयोजित केलेल्या विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पदक, प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
लोको पायलट कोमल असटकर २० नोव्हेंबर रोजी यशवंतपूर-चंदीगड एक्स्प्रेसचे चालक होते. गाडी रहमतपूर स्टेशनवरून निघत असताना त्यांना रुळांचा व चाकाच्या आवाजात बदल झाल्याची जाणीव झाली. त्यांनी तत्काळ रेल्वे कोरेगावला थांबवली. तेव्हा रुळांची पाहणी केली असता रुळांना तडे गेले असल्याचे आढळून आले. असटकर यांच्या सतर्कतेमुळे रेल्वे अपघात टळला. त्याची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले. या वेळी अतिरिक्त सरव्यवस्थापक आलोक सिंह, प्रधान मुख्य सेफ्टी अधिकारी डी. वाय. नाईक, प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक मुकुल जैन, प्रधान मुख्य इंजिनिअर राजेश अरोरा, प्रधान मुख्य विद्युत इंजिनिअर एन. पी. सिंह, मुख्य प्रशासनिक अधिकारी (परियोजना) शिशिर दत्त आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.