एक मच्छर आदमीको... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एक मच्छर आदमीको...
एक मच्छर आदमीको...

एक मच्छर आदमीको...

sakal_logo
By

‘‘साहेब, मी नाकासमोर चालणारा सभ्य माणूस आहे. मी कधीही कोणाला दमदाटीच काय पण कधी उलटंही बोललो नाही आणि तुम्ही माझ्यावर एकाला लुटल्याचा आरोप करताय?’’ अनिलने हवालदारसाहेबाला जाब विचारला.
‘‘हे बघ, तुझ्याविरूद्ध अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. काल रात्री अकराच्या सुमारास तू एका व्यक्तीला चाकूची धाक दाखवून लुटलंस की नाही?’’ हवालदारसाहेबांनी आवाज चढवत म्हटले. त्यांनी फिर्यादीलाच बोलावून घेतलं.
‘‘साहेब, याच चोरानं मला रात्रीच्या अंधारात चाकू दाखवून लुटलं होतं.’’ फिर्यादीने म्हटले.
‘‘साहेब, अंधारात या माणसानं मला कसं ओळखलं? ’’ अनिलने प्रतिप्रश्‍न केला.
‘‘नाही साहेब, हाच तो चोर आहे. यानेच मला चाकू दाखवला.’’ फिर्यादीने म्हटले.
‘‘साहेब, घरगुती चाकू विकण्याचा माझा फिरता व्यवसाय आहे. त्यामुळे मी फेरीवाल्यासारखा कोठेही चाकू विकत असतो. काल रात्री या माणसाला मी फक्त चाकू दाखवला. माझा हेतू त्यांना चाकू विकण्याचा होता. मी त्यांना दमदाटी केली नाही, की मारहाणसुद्धा केली नाही. उलट त्यांनीच खिशातील सगळा ऐवज माझ्या हातात दिला व मी काही बोलण्याच्या आत ते पळून गेले. यात माझा काय दोष आहे का? त्यामुळे तुम्ही जो समजता आहात, तो मी नव्हेच!’’ कानांच्या दोन्ही पाळ्यांना हात लावत अनिलने स्पष्टीकरण दिले.
‘‘परवा रात्री घरफोडी करण्याच्या उद्देशाने तू एका घरात खिडकीतून आत घुसला होतास. त्या घरातील लोकांनी घाबरून, घरातला ऐवज तुझ्या हातात दिला की नाही?’’ हवालदारसाहेबांनी दरडावून विचारले.
‘‘साहेब, तुमचा आणि त्या घरमालकाचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. चाकूविक्रीतून मला फारसे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी मी एका कुरिअर कंपनीत काम करतो. दसकुटे यांचे कुरिअर घेऊन, मी त्यांच्या घरी गेलो होतो. मात्र, दिवसा त्यांच्या घरी कोणी नसल्याने परत आलो. त्यामुळे मी माझे काम संपवून रात्री त्यांच्या घरी कुरिअर देण्यासाठी गेलो होतो. अनेकवेळा दरवाजा ठोठावूनही त्यांनी दार उघडले नाही. त्यामुळे मी खिडकीतून त्यांच्या घरात गेलो. त्यांचे कुरिअर दिले. त्यानंतर त्यांनी रोकड व दागिने माझ्या हातात दिले. मला वाटले कुरिअर दिले म्हणून त्यांनी मला बक्षिस दिले आहे. पोस्टमन किंवा कुरिअरबॉयला अशा पोस्तची वा बक्षिसांची सवय असते. दिवाळीत तर आम्ही ‘पोस्त’ मागून घेतो. मी दसकुटे यांना व त्यांच्या कुटुंबीयांना अजिबात धमकावले नाही. त्यांनी दिलेली बक्षिसी स्वीकारणे गुन्हा आहे का? त्यामुळे तुम्ही जो समजता आहात, तो मी नव्हेच !’’ अनिलने डोळे बंद करून कानावर हात ठेवत म्हटले.
‘‘काल दुपारी पीएमटीमध्ये तू एकाचे पाकीट मारले होतेस. त्याने तुझा फोटो पाहून, तुला ओळखले आहे.’’ हवालदारसाहेबांनी म्हटले.
‘‘साहेब, दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाणाऱ्यावर तुम्ही वाट्टेल ते आरोप करू नका. काल पीएमटीमध्ये मोठी गर्दी होती. समोरच्या व्यक्तीच्या पॅंटच्या खिशातील पाकीट वर आले होते. त्यामुळे गर्दीत ते पडून हरवू नये, या उदात्त हेतूने मी संबंधित व्यक्तीच्या खिशातून बाहेर काढले. केवळ माणुसकीच्या नात्याने मी असं वागलो. मात्र, तेवढ्यात ती व्यक्ती पुढच्या स्टॉपला उतरली. यात माझा काय दोष आहे का? त्यामुळे तुम्ही जो समजता आहात, तो मी नव्हेच !’’ अनिलने कानावर हात ठेवत म्हटले. त्यानंतर हवालदारसाहेबांनी त्याला आतील रूममध्ये नेऊन, त्याच्यावर चांगलेच फटके टाकले.
मात्र, आपल्याला हवालदारसाहेबांनी मारहाण केल्याचे तक्रार अनिलने वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली. त्यावेळी हवालदारसाहेब म्हणाले, ‘‘साहेब, याच्या अंगावर मच्छर बसला होता. मच्छर चावून याला कोणता आजार होऊ नये, यासाठी मी मच्छरला काठीने मारले. त्यामुळे याला मारहाण करणारा ‘तो मी नव्हेच.’’