‘संगीत दहन आख्यान’ प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘संगीत दहन आख्यान’ प्रथम
‘संगीत दहन आख्यान’ प्रथम

‘संगीत दहन आख्यान’ प्रथम

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित ६१ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत पुणे केंद्रातून ‘व्यक्ती, पुणे’ संस्थेच्या ‘संगीत दहन आख्यान’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, नाट्य संस्कार कला अकादमीच्या ‘वार्ता वार्ता वाढे’ या नाटकाने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या दोन्ही नाटकांची आता अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
सदाशिव पेठेतील भरत नाट्य मंदिरात १५ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेत एकूण २१ नाटके सादर झाली होती. त्याचा निकाल शुक्रवारी (ता. ९) सायंकाळी जाहीर करण्यात आला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अरुण भडसावळे, सुहास देशपांडे आणि मदन दंडगे यांनी काम पाहिले.
स्पर्धेत आकांक्षा बालरंगभूमीच्या ‘तुटक’ नाटकाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. दिग्दर्शनासाठी सुयश झुंजुरके (संगीत दहन आख्यान) आणि सागर लोधी (तुटक) यांना अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. प्रकाशयोजनेसाठी निखिल मारणे (संगीत दहन आख्यान) आणि राहुल जोगळेकर (आबालाल आडकित्ते आणि मुमताज महल) यांनी तर नेपथ्यासाठी जयंत टोले (बिंदू सरोवर) आणि नितीन पगारे (ठिय्या) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांकाचे पटकावले. रंगभूषेसाठी अरविंद सूर्य (बिंदू सरोवर) आणि तृप्ती टिंबे (संगीत दहन आख्यान) यांनाही अनुक्रमे प्रथम, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले. उत्कृष्ट अभिनयासाठीचे रौप्यपदक प्रवीण काळोखे (तुटक) आणि अद्वैता कुळकर्णी (संगीत दहन आख्यान) यांना तर उज्वला गौड, हेमांगी काळे-गरुड, चंदाराणी खलाटे, दिपेन्ती चिकणे, कोमल पवार, हिमांशू पिल्ले, ज्ञानेश्वर भिल्लारे, प्रतीक गंधे, महेंद्र मारणे, मंथन महाडीक या कलाकारांना अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे जाहीर झाली आहेत.