‘ॲस्ट्रो टुरिझम’च्या माध्यमातून ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास पूर्वीपासून आकर्षण असलेल्या खगोल पर्यटनाला जिज्ञासूंची वाढती पसंती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘ॲस्ट्रो टुरिझम’च्या माध्यमातून ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास
पूर्वीपासून आकर्षण असलेल्या खगोल पर्यटनाला जिज्ञासूंची वाढती पसंती
‘ॲस्ट्रो टुरिझम’च्या माध्यमातून ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास पूर्वीपासून आकर्षण असलेल्या खगोल पर्यटनाला जिज्ञासूंची वाढती पसंती

‘ॲस्ट्रो टुरिझम’च्या माध्यमातून ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास पूर्वीपासून आकर्षण असलेल्या खगोल पर्यटनाला जिज्ञासूंची वाढती पसंती

sakal_logo
By

पुणे, ता. ८ : पृथ्वीच्यापलीकडे अवकाशात होत असलेल्या घडामोडी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणे अवघड असले, तरी आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा दुर्बिणींच्या माध्यमातून ते साध्य केले जात आहे. ग्रह-ताऱ्यांबाबत कुतूहल असलेल्यांना ‘ॲस्ट्रो टुरिझम’ म्हणजेच खगोल पर्यटनाच्या माध्यमातून विश्र्व किती गुंतागुंतीचे आहे, याबाबत समजत आहे. त्यात सहजपणे उपलब्ध होत असलेल्या दुर्बिणी व कॅमेरा यांमुळे खगोल पर्यटनासाठी हौशी खगोल निरीक्षक बाहेर पडत आकाशातील चंद्र, सूर्य, ताऱ्यांच्या निरीक्षणामध्ये मग्न होत आहेत. पर्यटन म्हटलं की साधारणपणे मौज-मजा असा समज असतो. पण पर्यटनाची चौकट एवढ्यापुरती मर्यादित न राहता ते अभ्यासाच्या दृष्टिकोनातूनही पुढे येत आहे. पर्यटनाचे क्षेत्र विस्तारत असून, त्यात खगोल पर्यटनाच्या पर्यायाला पसंती मिळत आहे.

आकाशदर्शनासाठी अशी निवडली जाते जागा
- सुकरपणे तारे पाहण्यासाठी, रात्रीच्यावेळी स्वच्छ आकाश
- वायू आणि प्रकाश प्रदूषण नसावे
- शहरापासून काहीसे लांब, मानवी वस्त्या कमी असणारे ठिकाण
- जलाशयापासून दूर किंवा दव पडण्याचे प्रमाण कमी असलेली ठिकाणे
- पुणे परिसरात मावळ, मुळशी, भोर येथील घाट परिसराला प्राधान्य

खगोल पर्यटनाचे आकर्षण पूर्वीपासून
लोकांमध्ये खगोल निरीक्षणाचे आकर्षण पहिल्यापासून कायम आहे. त्यात अलीकडच्या काळात कुटुंबासह अशा पर्यटनाला प्राधान्य देण्याचे प्रमाण वाढले आहे. बऱ्याच पालकांना खगोलशास्त्राची गोडी त्यांच्या लहानपणीच निर्माण झाल्याने ते आता त्यांच्या मुलांनाही खगोलशास्त्राची आवड निर्माण करत आहेत. त्यामुळे पालक व मुले खगोल पर्यटनात सहभाग घेत आहेत. पूर्वी खगोल पर्यटन हे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून केले जात होते. परंतु अलीकडे याचा व्यवसाय म्हणून वापर होत आहे. कित्येक आयोजकांना खगोलशास्त्राचे पुरेसे ज्ञान नसते. त्यामुळे खगोल पर्यटन करताना संबंधित आयोजकांकडे असलेले ज्ञान, साधने अशा सर्व गोष्टींची पाहणी नागरिकांनी करणे आवश्‍यक आहे, असे खगोलविश्र्व संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

खगोल पर्यटनाचे फायदे
- विद्यार्थ्यांना ग्रह, तारे, विवरांची प्रत्यक्ष पाहणीतून माहिती
- लहान मुलांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण होते
- प्रत्यक्षात चंद्र, तारे किंवा ग्रहांचे आकार, रंग, रचना पाहणे शक्य
- संशोधनासाठी गरजेचे

सध्या खगोलिय छायाचित्रांकनाची आवड हौशी खगोल निरीक्षकांमध्ये वाढल्याने खगोल पर्यटनाचे आकर्षण वाढले आहे. पूर्वी डिजिटल कॅमेरे, दुर्बिण अशी सर्व साहित्ये सहज उपलब्ध होत नव्हती. त्यात ‘स्टार ट्रेल्स’ प्रकारातील छायाचित्रासाठी मोठ्या टेलिस्कोप किंवा इतर साधनांची गरज भासत नाही. मोबाईल, डिजिटल कॅमेराच्या साहाय्याने ते शक्य आहे. त्यासाठी रात्रीच्या वेळी स्वच्छ आकाशाची गरज असते. यासाठी बऱ्याचदा हौशी खगोल निरीक्षकांकडून ‘डार्क स्काय’ नेमके कोणकोणत्या भागात आहे, याचे सर्वेक्षण केले जाते. त्यानुसार खगोल पर्यटन केले जाते. तसेच सरकारकडून लडाखला ‘ॲस्ट्रो टुरिझम’चे ठिकाण म्हणून निरीक्षणास परवानगी देण्यात आली आहे.
डॉ. सागर गोखले, ज्योतिर्विद्या संस्था