Swasthyam 2022 : ‘यशस्वी नात्यासाठी आनंदाचा शोध घ्या’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Ritesh and Genelia Deshmukh
‘यशस्वी नात्यासाठी आनंदाचा शोध घ्या’

Swasthyam 2022 : ‘यशस्वी नात्यासाठी आनंदाचा शोध घ्या’

पुणे : ‘आई-वडील, बहीण-भाऊ, मित्र-मैत्रिणी अशा प्रत्येक नात्यात आनंद शोधणे, अतिशय गरजेचे आहे. समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हास्य कसे फुलवता येईल, याचा विचार आपल्याला करता यायला हवा. जोडीदारासह प्रत्येक क्षणाचा आनंद घेता येणे, हीच यशस्वी नात्याची गुरुकिल्ली आहे’, असा सल्ला अभिनेते रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख यांनी रविवारी दिला. ‘स्वास्थ्यम्’ या आरोग्याविषयक जागर करणाऱ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या समारोपाच्या दिवशी म्हणजे रविवारी (ता. ११) ‘लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन’ या सत्रात रितेश आणि जिनिलिया यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी नातेसंबंध, त्यातील ताणतणाव, आरोग्यदायी जीवनशैली आदींवर मनमोकळे भाष्य केले. ‘सकाळ’च्या संचालिका मृणाल पवार आणि संपादक-संचालक श्रीराम पवार यांनी त्यांचे स्वागत केले.

आज ज्या जीवनमूल्यांवर जगत आहोत, त्याची शिकवण आई-वडिलांकडून मिळाल्याचे रितेश देशमुख यांनी सांगितले. ‘‘कुटुंबासह एकदा आम्ही लंडनमध्ये असताना एका मॉलमध्ये गेलो होतो. त्या वेळी वडिलांना म्हणजे विलासराव देशमुख यांना त्यांच्या आवडीचे शूज भेट देण्यासाठी मी एका स्टोअरमध्ये गेलो. बाहेर आल्यावर पाहिले, तर ते सेलची पाटी असलेल्या दुसऱ्या स्टोअरमध्ये शूज पाहत होते. तुझ्या एका शूजच्या किमतीत येथे तीन शूज येतील, असे ते म्हणाले. किंमत आणि मूल्य यातील फरक मला त्या दिवशी कळला’’, असा किस्सा रितेश यांनी सांगितला.
समाज माध्यमांवर त्यांच्या गाजत असलेल्या रिल्सबद्दलही रितेश व जिनिलिया यांनी भाष्य केले. ‘कोरोना काळात सगळेच घरी होते, त्यामुळे नैराश्य आले होते. अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले होते. नवीन मनोरंजनही उपलब्ध नव्हते. त्या वेळी लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी रिल्सची कल्पना सुचली. पण त्यात आम्ही कायम इतरांवर नाही, तर स्वतःवर विनोद करण्याचे पथ्य पाळले’, असे या दोघांनी सांगितले.

पहिला चित्रपट मराठीतच साकारला
रितेश देशमुख यांनी दिग्दर्शित केलेला आणि रितेश व जिनिलिया यांची निर्मिती, तसेच अभिनय असलेला ‘वेड’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘वेड तुझे विरह वणवा’ या गीतावर ताल धरत रितेश आणि जिनिलिया यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली. ‘माझा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट मराठीच असेल, असे मी ठरवले होते. त्यामुळे या चित्रपटातून मी दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले’, असे रितेश यांनी सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ‘वेड’ चित्रपटात दोन प्रेमकथा आहेत. ‘युथफुल’ चित्रपट असला तरी तरुणांसह संपूर्ण कुटुंबाला हा चित्रपट नक्कीच आवडेल, असा विश्वास जिनिलिया यांनी व्यक्त केला.

‘महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती परिपूर्ण’
आम्ही पूर्वी मांसाहारी होतो. पण सहा वर्षांपूर्वी जीवनशैलीत बदल करत आम्ही आधी शाकाहारी झालो, मग चार वर्षांपूर्वी व्हेगन झालो. याची सवय होईपर्यंत ते अंमलात आणणे नक्कीच कठीण आहे, पण सवय झाल्यानंतर ते अगदी सोपे वाटते, असे रितेश देशमुख यांनी सांगितले, तर ‘महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती अतिशय परिपूर्ण आहे. आपण आज आहाराबाबत वेगवेगळ्या संज्ञा ऐकतो. मिलेट्स खावे, असे आपण म्हणतो. पण भाकरी म्हणजे तेच आहे. प्रोटीन खायचे आहे, असे सांगतो. पण शेंगदाण्याच्या चटणीत तेच आहे. त्यामुळे आपला पारंपरिक आहारच आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सुयोग्य आहे’, असा सल्ला जिनिलिया देशमुख यांनी दिला.

वडिलांचे ते वाक्य आजही आठवते...
‘‘लहानपणी मला चित्रपट पाहण्याची आवड होती, पण त्यातच करियर करायचे, असे ठरवले नव्हते. अचानक एक चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. पण त्या वेळी माझे वडील मुख्यमंत्री असल्याने मी विचारात पडलो. चित्रपट अयशस्वी झाला किंवा माझे काम लोकांना आवडले नाही, तर वडिलांचे नाव खराब होईल, अशी भीती वाटत होती. ही गोष्ट वडिलांना सांगितल्यावर ते म्हणाले, ‘मी माझ्या नावाची काळजी घेतो, तू तुझ्या नावाची काळजी घे.’ त्यांचे हे वाक्य आजही लक्षात आहे,’’ असे रितेश देशमुख यांनी सांगितले.

सुदृढ नात्यासाठी रितेश व जिनिलियाच्या टिप्स
- नात्यात बदल होणार, व्यक्तींचे स्वभावही बदलणार. हे बदल सकारात्मक पद्धतीने स्वीकारता यायला हवेत.
- नात्यात कमिटमेंट देण्याच्या नादात गोंधळ करू नका. आधीच गोष्टी ठरवू नका. प्रवाहानुसार पुढे जा.
- एक स्त्री म्हणून स्वतःला डेडलाइन देऊ नका, स्वतःला ताण देऊ नका.
- नात्यावर अपेक्षांचे ओझे लादू नका. अपेक्षाविरहित नात्यातून अधिक आनंद मिळतो.
- कपडे, बूट आदींमध्ये गुंतवणूक करू नका. त्यापेक्षा शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास आणि आरोग्य यात गुंतवणूक करा.
- कोणत्याही भेटवस्तूपेक्षा वेळ ही सर्वाधिक मौल्यवान आहे. त्यामुळे कुटुंबाला वेळ द्या, त्यांच्यासह कायम लक्षात राहतील अशा आठवणी तयार करा.
- कितीही मोठी चूक असेल, तरी समोरच्या व्यक्तीला माफ करायला शिका. यामुळे तुमचाच ताण कमी होईल.
- भविष्याचा विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आत्ताच्या क्षणात जगा.
- आपल्या आईसमोर किंवा वडिलांसमोर मनमोकळेपणाने प्रेम व्यक्त करा. त्यांचे स्थान आपल्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे, हे त्यांना आवर्जून सांगा.