सुख मिळविण्याची कला आत्मसात करा : गौरांग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुख मिळविण्याची कला आत्मसात करा : गौरांग
सुख मिळविण्याची कला आत्मसात करा : गौरांग

सुख मिळविण्याची कला आत्मसात करा : गौरांग

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : ‘‘ताणतणाव, चिंता आणि प्रत्येक मानसिक आजाराला प्रतिबंध करून मनाची प्रसन्नता मिळविण्यासाठी सुख मिळविण्याची कला आत्मसात केली पाहिजे. त्यासाठी भगवद्गगीता हे सर्वश्रेष्ठ तंत्रज्ञान असून, ‘एस्केप’ हा परवलीचा शब्द आहे,’’ असे श्रीमद्‍भगवद्‍गीतेतील विचारांचा जगभर प्रसार करणारे इस्कॉनचे गौरांग दास यांनी रविवारी येथे स्पष्ट केले.
‘सकाळ’तर्फे आयोजित ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमात दास ‘सुख मिळविण्याची कला’ या विषयावर बोलत होते. ते म्हणाले, ‘‘आपले मन हे जिद्दी, चंचल आणि बलवान आहे. त्याला नियंत्रित करण्यासाठी सकाळी उठल्यानंतर मनाचा व्यायाम करा. मंत्रोच्चार किंवा ध्यानधारणा करा. यातून मन केंद्रित होईल. तुम्ही रात्री नऊ ते सकाळ नऊ वाजेपर्यंत काय करता यावर सकाळी नऊ ते रात्री नऊ तुम्ही काय करणार हे अवलंबून असते. सकाळी नऊ ते रात्री नऊ या दरम्यान ताणतणाव असतील, अनिश्चितता असेल यापैकी कोणतीच गोष्ट तुमच्या नियंत्रणात नसते. मात्र, रात्री नऊ ते सकाळी नऊ या वेळेवर तुमचे नियंत्रण असते. त्यामुळे ज्यांनी रात्री नऊ ते सकाळी नऊ हे बारा तास नियंत्रित केले तो सकाळी नऊनंतरचे बारा तास नियंत्रित करू शकतो.’’

‘स्व’ व्यवस्थापन पहिली पायरी
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगातील असे एकही क्षेत्र नाही की मानवाने तेथे आपल्या यशाची मोहोर उमटविली नाही. पण माणसाचे आपले शरीर आणि मन यावरील नियंत्रण सुटत चालले आहे. देशातील मोठ-मोठ्या व्यवस्थापन संस्थांमधून अर्थव्यवस्था, समस्यांच्या व्यवस्थापनाचे धडे दिले जात आहेत. पण, आपण आपले मन, इंद्रिये, सवयी आणि दिनचर्या याचे व्यवस्थापन कसे करायचे? याचे मूलभूत धडे गिरविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे स्व व्यवस्थापन ही व्यवस्थापनाची पहिली पायरी असल्याचे आता स्पष्ट झाले, असेही त्यांनी सांगितले.

सुख मिळविण्याची कला
मन ज्या वेळी अस्वस्थ असते, त्या वेळी त्याला रुग्णालयाची आवश्यकता असते. अशा वेळी मनाचे रुग्णालय म्हणून मंदिर काम करते. तेथे जे औषधोपचार केले जातात. त्याला मंत्र म्हणतात. देशातील १३० कोटी लोकसंख्येसाठी फक्त नऊ हजार मानसोपचारतज्ज्ञ आहेत. दीडशे वर्षांपूर्वी मानसोपचारतज्ज्ञ नव्हते. कारण, लोक मनःशांतीसाठी नियमित मंदिरात जात होते, असे दास यांनी स्पष्ट केले.

भगवद्‍गीता सर्वश्रेष्ठ तंत्रज्ञान
आपले शरीर हे संगणकाप्रमाणे, तर मन हे संगणकाची हार्डडिस्कप्रमाणे आहे. हार्डडिस्कमध्ये व्हायरस शिरला, तर सगळी संगणकीय व्यवस्था कोलमडते. संगणक ‘हँग’ होतो. मनरूपी हार्डडिस्क ‘हँग’ होते त्याला नैराश्यसारखे मानसिक विकार म्हणतात. धनुर्धारी अर्जुन महाभारताच्या रणभूमित अशा मानसिक अवस्थेत सापडला होता. त्या वेळी भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला ‘अँटी डिप्रेशन’ औषध दिले ते होते भगवद्‍गीता. भगवद्‍गीता ही आपल्याला आंतरिक परिवर्तनासाठी मदत करते. श्रीकृष्णाने अर्जुनाचे कौशल्य बदलले नाही; पण, त्याची मानसिकता बदलली, असेही त्यांनी सांगितले.

एस्केप (ईएससीएपीई)

ई - (एक्सपेक्टेशन) अपेक्षा : अपेक्षा आणि वस्तुस्थिती यातील दरी म्हणजे ताण, असे भगवद्‍गीतेत स्पष्ट केले आहे. आपल्या जीवनात अपेक्षेप्रमाणे प्रत्येक गोष्ट होत नाही. काही वेळा अपेक्षाभंग होतो. यशस्वी आणि आनंद यातील अचूकता ओळखण्यासाठी भगवद्‍गीता उपयुक्त ठरते.

एस - (सक्सेस) यश : यशाचा अर्थ विजय असा नाही, तर तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे शंभर टक्के प्रयत्न करा, असा आहे. हे यशाचा अर्थ भगवद्‍गीतेने सांगितला. आयुष्यातील कोणत्याही टप्प्यावर कितीही संकटे आली तरीही आशा सोडू नका. आपल्या भोवताली घडणाऱ्या घटनांवर आपले मर्यादित नियंत्रण आहे. मात्र चेतनेवर असीमित नियंत्रण आहे. आर्थिक नुकसान, प्रतिमा मलीन होणे, संपत्ती जाणे, आरोग्याच्या समस्या निर्माण होणे यापैकी एकातही मोठी हानी नाही. पण ज्या वेळी आशेचा किरण नसेल तर तेथे यश मिळविणे अवघड असते.

सी - (कंपॅरिझन) तुलना : तुलना करण्याची प्रवृत्ती हे जीवन दुःखी होण्याचे मूळ कारण असते. सोशल मीडियामुळे आपण काय करतो, यापेक्षा दुसरा काय करतो, यावर लक्ष जास्त असते. त्यामुळे स्वतःवर लक्ष केंद्रित करा. आपल्या बलस्थानांचा सकारात्मक वापर केल्यास समाधानी होता येते.

ए - (ॲप्रिसिएशन) कृतज्ञता : आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल आपण कृतज्ञ असले पाहिजे. चांगले शरीर मिळाले आहे, त्याबद्दल आपण किती कृतज्ञ असतो. कुटुंब संस्था हे भारतीय संस्कृतीचे बलस्थान आहे. त्यामुळे कुटुंबातील संस्कार जपले पाहिजेत. त्यासाठी आध्यात्मिक, धार्मिक संस्कार हे कुटुंबाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचतात. कुटुंबातून आलेल्या मूल्यसंस्कारांबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत, हे सर्वांत महत्त्वाचे आहे. कारण, आपली गुंतवणूक जिथे नसते त्या संस्था नष्ट होतात. कुटुंब संस्थेत आपण आपली गुंतवणूक केली नाही, तर लवकरच त्या कालवश होतील.

पी - (प्रिन्सिपल्स) तत्त्व : जीवनात काही तत्त्वे आवश्यक असतात. त्यातून जगण्याला दिशा मिळते. नम्रता, दृढनिश्चय, जिद्द, संकल्प ही तत्त्व त्यासाठी उपयुक्त ठरतात. मात्र, या जीवनतत्त्वातील खरेपण गरजेचे असते, असे भगवद्‍गीतेने स्पष्ट केले आहे. तुमच्या उद्देशामध्ये शुद्धता असेल, तर त्यातून तुम्हाला उत्स्फूर्त प्रोत्साहन मिळते. त्याआधारावर एकाग्र होऊन योग्य पर्याय निवडण्याची विवेकबुद्धी वापरता येते.

ई - (इड्युरन्स) सहनशीलता : मनाविरुद्ध गोष्टी घडल्यानंतर त्या वेळी फक्त सहनशीलता महत्त्वाची ठरते. ऋतूमध्ये बदल होतात, त्याचप्रमाणे यश-अपयशाचा खेळ सुरू राहणार आहे. त्यामुळे यश-अपयश येईल आणि जातील; पण आपले कर्तव्य करत राहण्याचा संदेश श्रीकृष्णाने अर्जुनाला दिला. आपण प्रयत्न करूनही काही गोष्टी बदलू शकत नाही, त्यामुळे त्या सहन करण्यापेक्षा दुसरा पर्याय आपल्याकडे नसतो.

‘सकाळ’चे अभिनंदन
‘‘आधुनिक शिक्षणप्रणालीमध्येही भारतीय प्राचीन ज्ञानाचा वापर आत्मसंयम आणि स्वयंशिस्तबद्धतेसाठी वापरण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर समाजामध्ये मानसिक आरोग्याबाबत जागृती करण्यासाठी ‘स्वास्थ्यम्’ हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल ‘सकाळ’च्या संचालिका मृणाल पवार यांचे हार्दिक अभिनंदन. हे समाजासाठी मोठे योगदान आहे. यामुळे जगतील इस्कॉनच्या साडेसातशे मंदिर आणि लाखो भक्तांतर्फे मी ‘सकाळ’चे अभिनंदन करत आहे, असा शब्दांत गौरांग दास यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


मानसिक आजाराची वस्तुस्थिती
- जगभरात ३० कोटी लोक मानसिक आजाराने ग्रस्त आहेत.
- आपल्या देशात दररोज सरासरी ३७० जण आत्महत्या करतात.
- ८० दशलक्ष सिगारेटचा रोजच्या रोज धूर होतो.
- यातून सहा दशलक्ष लोकांचा दरवर्षी मृत्यू होतो

PNE22T10626, PNE22T10622, PNE22T10623, PNE22T10627