अभिनय म्हणजे ताकदीनिशी उभा केलेला आभास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिनय म्हणजे ताकदीनिशी उभा केलेला आभास
अभिनय म्हणजे ताकदीनिशी उभा केलेला आभास

अभिनय म्हणजे ताकदीनिशी उभा केलेला आभास

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः कोणताही अभिनेता नाटक किंवा चित्रपटामध्ये आपल्या वाट्याला आलेली व्यक्तिरेखा ही आपले मूळ व्यक्तिमत्त्व विसरून साकारत असतो. अन्य व्यवसायप्रमाणे अभिनेत्याला शपथ घ्यावी लागत नाही. त्यामुळे कलाकार हे मुळात व्यावसायिक खोटारडे असतात. अभिनय म्हणजे ताकदीनिशी उभा केलेला आभास आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांनी रविवारी व्यक्त केले.

मंजुल प्रकाशनातर्फे बेदी यांच्या ‘स्टोरीज आय मस्ट टेल’ या आत्मकथनाचा मराठी व हिंदी भाषेतील अनुवाद प्रकाशित झाला आहे. या निमित्ताने बेदी यांच्याशी अभिनेत्री विभावरी देशपांडे यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. ‘कन्नड, तेलगू, पंजाबी भाषेतील चित्रपटांसह इटालियन कार्यक्रमाचे काम सध्या सुरू आहे. संधी मिळाली तर मला मराठीमध्ये काम करायला आवडेल’, अशी इच्छा बेदी यांनी व्यक्त केली.

बेदी म्हणाले, ‘‘रुबाबदार व्यक्तिमत्त्व असण्याचे फायदे झाले तसे तोटेही झाले. अनेक चांगल्या भूमिका करता आल्या नाहीत. जाहिरात क्षेत्रात काम केल्याने लेखनाची सवय असली तरी लेखक नव्हतो. केवळ आनंद मिळवण्यासाठी लेखन करायचो. रंगभूमी, चित्रपटातील काम आणि लेखन, मला सगळ्या भूमिका आवडतात. दहा वर्षांचा विचार आणि कोरोना काळातील दीड वर्षांचे लेखन यातून हे पुस्तक साकारले. मी लोकप्रिय असलो तरी माझी कथा कोणाला माहीत नाही. ही आत्मकथा आता या पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांसमोर येत आहे.’’

‘चित्रपट, दूरचित्रवाणी, व्हीडीओ, डीव्हीडी आणि इंटरनेट असे तंत्रज्ञानाने झपाट्याने केलेल्या बदलांचा मी साक्षीदार आहे. आज तर ओटीटी व्यासपीठामुळे चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात देखील जावे लागत नाही’, या परिस्थितीकडे बेदी यांनी लक्ष वेधले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजीव मिश्रा यांनी केले, तर मंजुल प्रकाशनाचे मुख्य संपादक चेतन कोळी यांनी आभार मानले.


ID: PNE22T10736