योगसाधनेतून मन अमर्यादित होईल : योगगुरू श्री एम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योगसाधनेतून मन अमर्यादित होईल : योगगुरू श्री एम
योगसाधनेतून मन अमर्यादित होईल : योगगुरू श्री एम

योगसाधनेतून मन अमर्यादित होईल : योगगुरू श्री एम

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : ‘‘योग हा केवळ समाजातील कोणता वर्ग, आश्रम किंवा व्यक्तींसाठी नाही. योग ही एक साधना असून, ज्याद्वारे व्यक्ती स्वतःला आत्मा म्हणून ओळखू शकतो. शरीर, मन आणि त्याच्यावर असलेला आत्मा समजण्याच्या प्रक्रियेलाच योग म्हणतात. योगसाधनेतून मर्यादित असलेले मन अमर्यादित होईल. म्हणून प्रत्येकाने योग करायला हवा,’’ असे विचार योगगुरू श्री एम यांनी रविवारी व्यक्त केले.
‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या ‘स्वास्थ्यम्’ उपक्रमाच्या समारोपप्रसंगी श्री एम यांनी ‘योग, प्राणायाम आणि निरोगी शरीर’ या विषयावर मार्गदर्शन केले. ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार या वेळी उपस्थित होते. पवार यांनी श्री एम यांचा सन्मान केला.
श्री एम म्हणाले, ‘‘लहानपणापासून आपल्याला मर्यादित ठेवण्यात आले आहे. तुम्ही काय करू शकता, काय नाही, हे आधीच ठरविले गेले आहे. त्यामुळे आपण त्याच साचेबंद पद्धतीने जगत आहोत. मात्र आपण अमर्यादित विचार केला, तर काहीही करू शकतो. या अमर्यादित क्षमतांना ओळखण्याची शक्ती, निर्बंध आयुष्य जगण्याचा मंत्र योगाद्वारे मिळतो. आपण आत्मा आहोत. त्याच्यापर्यंत पोचण्यासाठी मन आणि शरीराला नियंत्रणात ठेवावे लागते. पुरुष ही एक आध्यात्मिक धारणा आहे. त्याला स्त्री आणि पुरुष अशा भेदात विभागता येत नाही. संसारात राहून आयुष्यातील समस्यांचा सामना करत असताना योगाद्वारे मन स्थिर ठेवणे म्हणजेच योग.’’

अष्टांग योगाचे महत्त्व विशद
पतंजलीने शास्त्रशुद्ध पद्धतीने योगाचे व्यवस्थापन करून त्याला आठ भागांत विभागले आहे, असे नमूद करत श्री एम यांनी अष्टांग योगाची माहिती दिली. रागावर ताबा कसा ठेवायचा? यापासून समाधीपर्यंतचा प्रवास त्यांनी काही उदाहरणांच्या माध्यमातून मांडला. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांग योगाचे महत्त्व त्यांनी विशद केले.

श्री एम यांनी दिलेला कानमंत्र
- एका वेळी एकाच कामावर ध्यान द्यावे
- योग केवळ संन्यासींसाठी नाही
- राग हा एक आजार आहे
- राग नसतो तेव्हा कामे सोपी होतात
- आयुष्यात समतोल साधता आला पाहिजे
- प्रत्येकाला सर्व साधना करता येणार नाहीत
- व्यक्तीनुसार विविध साधना आहेत
- धारणेत सातत्य असेल तर ध्यान लागते
- आत्मा वाईट नसतो, त्यामुळे बाह्य रूपावरून अंदाज बांधू नका
- आनंद भौतिक बाबींवर अवलंबून नको