‘पुणे बंद’ला गणेशोत्सव मंडळांचा पाठिंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पुणे बंद’ला गणेशोत्सव मंडळांचा पाठिंबा
‘पुणे बंद’ला गणेशोत्सव मंडळांचा पाठिंबा

‘पुणे बंद’ला गणेशोत्सव मंडळांचा पाठिंबा

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः काही लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या पदांवरील व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केली जात आहेत. यामुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या असून, या वक्तव्याचा खेदजनक निषेध व्यक्त करत पुण्यातील चाळीस गणेशोत्सव मंडळांनी १३ डिसेंबरच्या ‘पुणे बंद’च्या आवाहनाला पाठिंबा दिला आहे.

श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, केसरीवाडा मंडळ, श्री तुळशीबाग गणपती सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यांसह शहरातील ३६ गणेशोत्सव मंडळांनी या बंदला पाठिंबा दिला आहे. याबाबत अण्णा थोरात म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. ते आमचे प्रेरणास्थान आणि स्फूर्तिस्थान आहेत आणि कायम राहतील. मात्र, गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केली जात आहेत. आपणच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आमच्या श्रद्धास्थानाबद्दल अशी बेताल विधाने करीत आहेत, यामुळे आम्ही निषेध व्यक्त करत आहोत.’’

मूक मोर्चाचे आयोजन
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरून महाराजांचा अपमान केल्याच्या निषेधार्थ सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरतर्फे मंगळवारी (ता. १३) पुणे बंद तसेच मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९.३० वाजता डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास प्रारंभ होणार आहे. डेक्कन जिमखाना, अलका चित्रपटगृह चौकमार्गे लक्ष्मी रस्त्याने बेलबाग चौकातून लालमहाल येथे येऊन मोर्चाची सांगता जाहीर सभेने होणार आहे. या मोर्चात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे आदी सहभागी होणार आहेत.