रिक्षा, कॅबला ‘ब्रेक’; ‘पीएमपी’च्या १४ हजार फेऱ्या रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिक्षा, कॅबला ‘ब्रेक’; ‘पीएमपी’च्या १४ हजार फेऱ्या रद्द
रिक्षा, कॅबला ‘ब्रेक’; ‘पीएमपी’च्या १४ हजार फेऱ्या रद्द

रिक्षा, कॅबला ‘ब्रेक’; ‘पीएमपी’च्या १४ हजार फेऱ्या रद्द

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः पुणे बंदचा मोठा परिणाम वाहतूक व्यवस्थेवरदेखील झाला. शहरातील रिक्षा व कॅबची वाहतूक दुपारी तीन वाजेपर्यंत पूर्णपणे बंद होती, तर पीएमपी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हडपसर डेपो पूर्ण बंद ठेवला. शहरातील सुमारे १४ हजार फेऱ्या रद्द केल्या. उर्वरित डेपो मिळून दिवसभरात १४४० बसच्या माध्यमातून सुमारे सहा हजार फेऱ्या झाल्या. रिक्षा व कॅब बंद असल्याने पुणे विमानतळ, रेल्वे स्थानक, स्वारगेट बस स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
बंदचा परिणाम मंगळवारी सकाळपासून जाणवत होता. शहराच्या प्रमुख रस्त्यांवर, बाजारपेठांमध्येदेखील तुरळक वाहतूक होती. बंदला पाठिंबा दर्शविण्यासाठी विविध रिक्षा संघटना यात सहभागी झाल्या होत्या. त्यामुळे शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षापासून ते प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांपर्यंत सर्वच बंद होते. हीच परिस्थिती कॅबच्या बाबतीत होती. त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. बाहेरगावच्या प्रवाशांना याची कल्पना नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय झाली. याचा फायदा घेत काही रिक्षाचालकांनी प्रवाशांकडून जास्तीची रक्कम घेत त्यांची अक्षरशः आर्थिक लूट केली. पुणे रेल्वे स्थानक, पुणे विमानतळ तसेच स्वारगेट बस स्थानकांवर हीच परिस्थिती होती.
नेहमीच्या तुलनेत १० टक्के कमी बसेस रस्त्यावर उतरविण्यात आल्या.

एसटी धावल्या, पण फेऱ्या रद्द
पुणे बंद असल्याने अन्य शहरांतून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होती. सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई, ठाणे आदी भागातून येणाऱ्या बसची संख्या कमी होती. बहुतांश फेऱ्या रद्द करण्यात आल्या. पुणे विभागानेदेखील ग्रामीण भागातील फेऱ्या रद्द केल्या होत्या. स्वारगेट व वाकडेवाडी स्थानकावर प्रवाशांची वर्दळ कमी होती.

रेल्वे स्थानकावर कमी प्रवासी
बंदचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरदेखील जाणवला. रेल्वे प्रवासी संख्या कमी होती. लांबपल्याच्या गाड्यांव्यतिरिक्त इंटरसिटी गाड्यांना प्रवाशांना गर्दी कमी होती. पुण्याला येणाऱ्या रेल्वेला प्रवासी संख्या कमी होती.