अंशत: अनुदानित शिक्षकांचे समायोजन होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंशत: अनुदानित शिक्षकांचे समायोजन होणार
अंशत: अनुदानित शिक्षकांचे समायोजन होणार

अंशत: अनुदानित शिक्षकांचे समायोजन होणार

sakal_logo
By

पुणे, ता. १३ :राज्यातील वैयक्तिक मान्यताप्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांचे आता समान टप्प्यावरील रिक्त पदावर समायोजन करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. हा निर्णय केवळ २०२२-२३ मध्ये संचमान्यतेने अतिरिक्त ठरलेल्या वैयक्तिक मान्यताप्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांना लागू असणार असणार आहे.
याबाबतची कार्यपद्धती शिक्षण विभागाकडून निश्चित करण्यात आली आहे. राज्यातील खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अंशत: अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे वैयक्तिक मान्यताप्राप्त शिक्षकांचे पद कमी झाल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येते. अशा सेवा समाप्त होणाऱ्या शिक्षकांचे सध्या असलेल्या नियमानुसार समायोजन करण्यात येत नाही. त्यामुळे राज्यातील वैयक्तिक मान्यताप्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांचे समायोजन करण्याची मागणी लोकप्रतिनिधी आणि शिक्षक संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुसार अशा शिक्षकांना पुन्हा सेवेची संधी देण्यासाठी समान टप्प्यावरील अंशत: अनुदानित रिक्त पदावर समायोजन करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत शालेय शिक्षण विभागाचे उप सचिव तुषार महाजन यांनी अध्यादेश काढला आहे.
२०२२-२३ च्या संचमान्यतेनुसार पद कमी झाल्याने सेवा समाप्त होणाऱ्या अशा शिक्षकांच्या समायोजनासाठी शिक्षण आयुक्तांच्या स्तरावर राज्यातील रिक्त असलेल्या अंशत: अनुदानित पदांचा आढावा घ्यावा, वैयक्तिक मान्यताप्राप्त अंशत: अनुदानित कर्मचाऱ्यांचे प्रथम संस्थेतंर्गत समान अनुदान टप्प्यावरील रिक्त पद उपलब्ध असल्यास समायोजन करण्यास प्राधान्य द्यावे, पद उपलब्ध नसल्यास इतर संस्थेच्या अनुदानाच्या समान टप्प्यावरील अंशत: अनुदानित पदावर समायोजन करावे, अशा प्रकारे समान टप्प्यावर पद उपलब्ध नसल्यास समायोजन करता येणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत अनुदानाचा टप्पा बदलून समायोजन करता येणार नाही, असे आदेशात नमूद केले आहे.