समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी संशोधन करावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी संशोधन करावे
समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी संशोधन करावे

समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी संशोधन करावे

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : ‘‘दर दिवसाला जगात अनेक बदल होत आहेत, त्या अनुषंगाने सध्या सरकारही दर शंभर दिवसांचे नियोजन करून त्याप्रमाणे आढावा घेत आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनीही या बदलत्या जगाचा आढावा घेत समाजाच्या प्रश्नांवर उत्तरे शोधणारे संशोधन करावे,’’ असे सेंटर फॉर मटेरिअल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नोलॉजीचे (सीमेट) महासंचालक डॉ. भरत काळे यांनी सुचविले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘आविष्कार’ या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेची विद्यापीठ पातळीवरील फेरी मंगळवारी झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. काळे बोलत होते. या वेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अंतर्गत गुणवत्ता व सिद्धता कक्षाचे संचालक डॉ. संजय ढोले आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. काळे म्हणाले, ‘‘अनेक मोठे प्रश्न सध्या भेडसावत आहेत. ई-कचरा, पडीक जमीन सुपीक करणे, शेती व तंत्रज्ञान यावर आणखी संशोधन होणे गरजेचे आहे. संशोधन हे केवळ भर घालणारे नाही तर नव्याने काही गोष्टी निर्माण करणारे असावे.’’

डॉ. सोनवणे म्हणाले, ‘‘आपल्या अवतीभोवतीचे जग समजून घेत प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला की त्यातूनच नव्या कल्पना शोधता येतात. फक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान नाही तर मानवता हेही संशोधनाचे खूप मोठे क्षेत्र आहे.’’ या वेळी प्रा. काकासाहेब मोहिते यांनी ‘आविष्कार’ स्पर्धेची माहिती दिली.

४८ प्रकल्पांची निवड होणार
ही स्पर्धा सुरवातीला महाविद्यालय पातळीवर घेण्यात आली. यात चार हजार विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले होते. त्यातून विभागीय स्तरावर स्पर्धा झाली असून त्यातून २३३ प्रकल्प निवडण्यात आले. आता विद्यापीठ स्तरावरील स्पर्धा होत असून त्यातून ४८ प्रकल्पांची निवड केली जाणार आहे. यंदा या स्पर्धेच्या आयोजनाचा मान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळाला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मोहन वामन यांनी केले. तर प्रा. रवींद्र जायभये यांनी उपस्थितांचे आभार मानले.