व्यावसायिकांना ३३ कोटींचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यावसायिकांना ३३ कोटींचा फटका
व्यावसायिकांना ३३ कोटींचा फटका

व्यावसायिकांना ३३ कोटींचा फटका

sakal_logo
By

पुणे, ता. १३ ः विविध संघटनांनी मंगळवारी पुकारलेल्या ‘पुणे बंद’ला प्रतिसाद देत व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला. यामुळे कपडे, सराफी बाजार, हॉटेल व्यवसाय, भुसार, भाजीपाला अशा वेगवेगळ्या व्यवसायांना सुमारे ३३ कोटी रुपयांचा फटका बसला.

राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (ता.१३) शहरातील सर्वधर्मीय शिवप्रेमींनी ‘पुणे बंद’ची हाक दिली होती. त्यास प्रमुख राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, गणेशोत्सव मंडळे, धार्मिक संघटना, व्यावसायिक व व्यापारी संघटना अशा एकूण २४ संघटनांनी पाठिंबा दर्शवीत बंदमध्ये सहभाग घेतला होता. व्यावसायिकांनी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत दुकाने बंद ठेवली.

शहरात कापड बाजारपेठ मोठी असून त्यांची दररोजची उलाढाल ८ ते १० कोटी असते. त्यामध्ये कापड व्यावसायिकांचे ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले. सराफी बाजारपेठेची दररोजची उलाढाल २५ कोटी रुपये असते. बंदमुळे त्यांचेही निम्मे म्हणजे १२ कोटी रुपयांचे नुकसान झाले. याच पद्धतीने हॉटेल व्यावसायिकांचे २ कोटी रुपये, पीएमपीएलचे २ कोटी रुपये, भुसार, फळ, भाजीपाला विभागाचे १२ कोटी रुपये अशा काही मोजक्‍या व्यवसायांचे ३३ कोटी रुपयांचे नुकसान झाले.

दरम्यान, मंगळवारी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.मध्यवर्ती भागासह उपनगरामध्येही व्यावसायिकांनी आपली दुकाने पूर्णवेळ बंद ठेवून बंदमध्ये सहभाग दर्शविला. काही हॉटेल, किराणा अशा किरकोळ विक्रेत्यांनी आपली दुकाने दुपारी तीन वाजल्यानंतर सुरु केली. त्यामुळे नागरिकांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला.