
पाणलोट क्षेत्रातील बांधकामांवरील बंदी उठविली
पुणे, ता. १४ : जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यातील सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या दोन्ही बाजूस दोनशे मीटरच्या परिसरात बांधकामांवर घातलेली बंदी राज्य सरकारकडून हटविण्यात आली आहे. अवघ्या पाच महिन्यांत हा आदेश रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. सुधारित निर्णयामुळे दोनशे मीटरच्या परिसरात जागा असलेल्या खासगी जागामालकांना दिलासा मिळाला आहे.
पुणे जिल्ह्यासह राज्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रालगत मोठ्या प्रमाणावर प्लॉट पाडून फार्म्सहाउस उभारण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढीस लागले आहे. कोणतीही परवानगी न घेता हे फार्म्सहाऊस उभारताना सांडपाण वाहून नेण्याची व्यवस्था नसल्यामुळे ते पाणी धरणाच्या जलशयात सोडले जात आहे. त्यातून जलप्रदूषणांचा धोका वाढू लागला आहे. खडकवासला धरणासह पुणे जिल्हयातील अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या परिसरात अशा स्वरूपाची बांधकामे वाढतच आहे. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी जलसंपदा विभागाने तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. त्याला राज्य सरकारने जुलै २०२२ मध्ये मान्यता दिली. मात्र जलसंपदा विभागाने घातलेल्या बंदीचे अंतर जास्तीचे असून पर्यटन व इतर विकासकामांना चालना मिळण्यासाठी त्यात सुधारणा करण्याची गरज अधिकारी व लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारकडे व्यक्त केली होती. त्यानुसार शासनाने धरणांच्या २०० मीटर परिसरातील बांधकाम बंदीचे आदेश उठविले असून, याबाबतचा शासन निर्णय जलसंपदा विभागाच्या उपसचिव न. गौ. बसेर यांनी जारी केला आहे.