
पं. भीमसेनजी व पं.जसराजांच्या मैत्रीचे उलगडले अंतरंग
पुणे, ता. १४ : ‘‘पंडित भीमसेन जोशी व त्यांनी सुरू केलेल्या सवाई गंधर्व महोत्सवाबद्दल माझे वडील पंडित जसराज यांच्या मनात अतोनात प्रेम, श्रद्धा व आदराची भावना होती. भीमसेनजी गेल्यावर तर या महोत्सवाशी त्यांची बांधिलकी अधिकच वाढून ती जबाबदारीच ते मानू लागले,’’ हे भावोद्गार दुर्गा जसराज यांनी आज व्यक्त केले.
आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा भाग म्हणून ‘षड्ज व अंतरंग’ हा कार्यक्रम शिवाजीनगरमधील सवाई गंधर्व स्मारक येथे हा कार्यक्रम झाला. मंडळाचे कार्याध्यक्ष पंडित श्रीनिवास जोशी यांनी दुर्गा व जसराजजींचे शिष्य पंडित रतन मोहन शर्मा यांना बोलते केले. या प्रसंगी जसराजजींच्या पत्नी मधुरा यांच्यासह ज्येष्ठ गायक पंडित सत्यशील देशपांडेही उपस्थित होते.
दुर्गा या वेळी म्हणाल्या, ‘बापूजी (पं. जसराज) प्रत्येक शिष्याला शिकवताना, त्याच्या स्वराशी आपला स्वर जुळवून घेत शिकवत. त्यामुळे तिन्ही सप्तकांत त्यांचा आवाज सहज फिरण्याची किमया शेवटपर्यंत राहिली. शब्द, स्वर व लयीचा ते गंभीरपणे विचार करत. शास्त्रीय संगीत भावहीन असले पाहिजे, ही धारणा असायच्या काळात बापूजी हृदयाला भिडणारं सादरीकरण करत. त्यांचे उच्चार एवढे स्पष्ट असूनही त्यांत एवढी रसपूर्णता कशी, असा प्रश्न लोकांना पडायचा. भीमसेनजींची कला, व्यक्तिमत्व व त्यांनी सुरू केलेल्या या महोत्सवाविषयी ते भरभरून बोलायचे. भारतीय शास्त्रीय संगीताला जगात जो सन्मान मिळाला आहे, त्यात या महोत्सवाचा सिंहाचा वाटा आहे, असे ते आवर्जून म्हणत.’’
शर्मा यांनी सांगितले की, जसराजजी हे माझे मामा होते. माझा जन्म राजस्थानातील. आई शास्त्रीय संगीत रीतसर शिकली नसली तरी ती ते ऐकून गाऊ शकत असे. माझे आजोबा पंडित मोतिरामजी हे पंडित दीनानाथ मंगेशकरांचे मित्र व संगीत नाटकप्रेमी असल्याने आईही मराठी नाट्यपदे गात असे. आईकडून मी हे शिकत असताना मला शास्त्रीय संगीत योग्य पद्धतीने शिकता यावे, यासाठी मामांकडे मला घरच्यांनी आणले. त्यानंतर मी त्यांच्याकडून आमच्या मेवाती घराण्याची तालीम घेतली. संगीत क्षेत्रातील अनेक मराठी गायक, वादकांशी त्यांचे स्नेहसंबंध होते. भीमसेनजींच्या गाण्याविषयी ते नेहमीच आदराने आम्हाला सांगत. माझा मुलगा स्वर हाही जसराजजींंकडे बालपणी गायन शिकला असल्याने त्यालाही संगीताबरोबरच जीवनशिक्षणाचे मोलाचे धडे मिळाले.
११२९५