
भवानी पेठेत साडे सतराशे बालकांचे गोवर लसीकरण
पुणे, ता. १४ ः शहरात भवानी पेठेत लोहियानगर, कासेवाडी येथे दोन लहान मुलांना गोवर झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर आरोग्य विभागाकडून या भागातील सर्वेक्षण करून १ हजार ७५१ मुलांचा शोध घेऊन त्यांना गोवर प्रतिबंधक लसीचा डोस दिला जाणार आहे. आत्तापर्यंत, त्यापैकी ५२९ जणांना डोस देण्यात आला आहे.
राज्यात गोवरची साथ पसरल्याने अनेक मुले आजारी पडतात. राज्य शासनाकडून याबाबत वारंवार लसीकरण व उपाय योजनांचा आढावा घेतला जात आहे. महापालिकेला लोहियानगर येथील चार वर्षांच्या आणि कासेवाडीतील दहा वर्षाच्या बालकाला गोवरची लागण झाल्याचे आढळून आले. चार वर्षांच्या मुलाने गोवरची एकही लस घेतलेली नव्हती, तर दहा वर्षाच्या मुलाबद्दल पालक संभ्रमात होते. हे दोघे एकाच भागातील असल्याने हा परिसरात कन्फर्म आउटब्रेक जाहीर केला गेला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या परिसरातील एक ते पाच वयोगटातील मुलांना मुलांचा शोध घेतला आहे. या भागात एक ते पाच वयोगटातील सुमारे १७५१ बालके आहेत, त्यांनी यापूर्वी लस घेतली असो किंवा नसो तरीही महापालिकेने या सर्वांचे लसीकरण सुरू केले आहे. आत्तापर्यंत ५२९ बालकांना लस देण्यात आली आहे. उर्वरित बालकांचे लसीकरण पुढील पाच दिवसांत पूर्ण केले जाईल. तसेच त्या दोन लहान मुलांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले आहे, असे महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.