होर्डींगचे शुल्क अडीच पटीने वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

होर्डींगचे शुल्क अडीच पटीने वाढणार
होर्डींगचे शुल्क अडीच पटीने वाढणार

होर्डींगचे शुल्क अडीच पटीने वाढणार

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः शहरातील बेकायदा होर्डींगवर कारवाई सुरू असताना दुसरीकडे महापालिकेने उत्पन्न वाढविण्यासाठी होर्डींगचे दर अडीच पटीपेक्षा जास्त पटीने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल ९ वर्षानंतर आकाश चिन्ह विभागाने शुल्क वाढविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यामध्ये प्रति चौरस फूट २२२ रुपये ऐवजी थेट ५८० रुपये शुल्क घ्यावे, तर समाविष्ट गावांमध्ये हा दर २९० चौरस फूट असावा असे, प्रस्तावित केला आहे. यावर स्थायी समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे.

आउट डोअर होर्डींगसाठी महापालिकेच्या आकाश चिन्ह विभागाने नियमावली तयार करून त्यानुसार परवानगी दिली जाते. २००३ मध्ये पुणे महापालिकेने प्रति चौरस फुटासाठी २२२ रुपये इतके शुल्क निश्‍चित केले होते. पण हे शुल्क जास्त असल्याचे सांगत अनेक होर्डींग व्यावसायिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत हे शुल्क १११ रुपये करावे, अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने या याचिकेवर अंतिम सुनावणी जो पर्यंत होत नाही तो पर्यंत व्यावसायिकांनी १११ रुपये प्रमाणे शुल्क भरावे असे आदेश दिले. दरम्यान ही याचिका अद्यापही प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिकेच्या कागदपत्रावर सुमारे ११८ कोटी रुपयांची होर्डींगची थकबाकीही निदर्शनास येते.

महापालिका आयुक्तांनी नुकताच उत्पन्न व खर्चाचा आढावा घेतला. त्यामध्ये उत्पन्न वाढीसाठी चर्चा करण्यात आली. त्यात आकाश चिन्ह विभागास होर्डींगचे शुल्क वाढविण्यासंदर्भातही सूचना देण्यात आल्या. त्यानुसार २०१३-१४ ते २०२२-२३ या कालावधीत दरवर्षी १० टक्के दरवाढ प्रस्तावित असून यानुसार २०२२-२३ साठी ५८० रुपये प्रति चौरस फूट इतके शुल्क प्रस्तावित केले आहे.

३४ गावांना ५० टक्के सवलत
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३४ गावांसाठीच्या होर्डींग शुल्काचे दर वेगळे आहेत. होर्डींगमधून मिळणाऱ्या मर्यादित उत्पन्नामुळे हे शुल्क कमी ठेवले आहे. ५८० रुपये शुल्कात गावांना ५० टक्के सवलत देऊन २९० रुपये प्रति चौरस फूट शुल्क घेतले जाईल. तसेच परवाना, छाननी शुल्कातही ५० टक्के सवलत असेल, असे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

दृष्टिक्षेपात
- अधिकृत होर्डींगची संख्या -२,३४८
- प्रचलित दरानुसार वार्षिक उत्पन्न - २९ कोटी
- अनधिकृत होर्डिंगची संख्या - १,९६५
- महापालिकेचे होणारे नुकसान - सुमारे २५ कोटी