पुरस्कारामुळे कलाकारांच्या कर्तृत्वावर शाबासकिची थाप ज्येष्ठ नाट्य लेखक सुरेश खरे यांचे मत ः गदिमा पुरस्काराचे वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरस्कारामुळे कलाकारांच्या कर्तृत्वावर शाबासकिची थाप

ज्येष्ठ नाट्य लेखक सुरेश खरे यांचे मत ः गदिमा पुरस्काराचे वितरण
पुरस्कारामुळे कलाकारांच्या कर्तृत्वावर शाबासकिची थाप ज्येष्ठ नाट्य लेखक सुरेश खरे यांचे मत ः गदिमा पुरस्काराचे वितरण

पुरस्कारामुळे कलाकारांच्या कर्तृत्वावर शाबासकिची थाप ज्येष्ठ नाट्य लेखक सुरेश खरे यांचे मत ः गदिमा पुरस्काराचे वितरण

sakal_logo
By

पुणे/कोथरूड, ता. १४ ः ‘‘पुरस्कार कोणी दिला, कसा दिला किंवा किती रकमेचा दिला, हा विचार महत्त्वाचा नाही. पुरस्कार ही कलाकारांसाठी सगळ्यात मोठी दाद असते. त्यामुळे प्रत्येक कलावंताला पुरस्काराचे मोल वाटत असते. कारण साहित्य आणि कला क्षेत्रातील कलाकारांना आपापल्या क्षेत्रात उभे राहण्यासाठी अनेक पातळ्यांवर त्याग आणि समर्पण करावे लागते. त्यांचा हा त्याग आणि समर्पण कौटुंबिक व सामाजिक पातळीवरदेखील असते. या पार्श्वभूमीवर गदिमा प्रतिष्ठान सारख्या संस्थेकडून ग. दि. माडगूळकर यांच्या नावाने पुरस्कार मिळणे, ही कलाकाराच्या कर्तृत्वावर दिलेली शाबासकीची थाप आहे,’’ असे मत ज्येष्ठ नाट्य लेखक सुरेश खरे यांनी बुधवारी (ता.१४) एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने ग. दि. माडगूळकर यांच्या ४५ व्या स्मृतिदिनानिमित्त आज ‘गदिमा स्मृती’ समारंभाचे आयोजन केले होते. या समारंभात सुरेश खरे यांच्या हस्ते विविध ‘गदिमा’ पुरस्कार प्रदान केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर आणि पुरस्कारार्थी डॉ. मोहन आगाशे, साधना बहुळकर, प्रवीण तरडे, गायिका योगिता गोडबोले आदी उपस्थित होते.

या समारंभात ज्येष्ठ चित्रपट-नाट्य अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना ‘गदिमा पुरस्कार’, साधना बहुळकर यांना ‘गृहिणी-सखी-सचिव पुरस्कार’, अभिनेते प्रवीण तरडे यांना ‘चैत्रबन पुरस्कार’ आणि गायिका योगिता गोडबोले यांना ‘विद्या प्रज्ञा पुरस्कारा’ने गौरविण्यात आले. या वेळी शीतल श्रीधर माडगूळकर लिखित ‘गदिमांच्या पंचवटीतून’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. तसेच सुरेश खरे यांनी त्यांच्याकडे असलेले ‘हीच व्दारका, हीच पंढरी’ हे ग. दि. माडगूळकर यांचे दुर्मिळ हस्तलिखित आनंद माडगूळकर यांच्याकडे सुपूर्त केले.

या वेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनी ग. दि. माडगूळकर यांच्याबरोबरील मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. आगाशे, साधना बहुळकर, प्रवीण तरडे, योगिता गोडबोले यांनीही मनोगत व्यक्त केले. गदिमा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त आनंद माडगूळकर यांनी प्रास्ताविक केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. विश्‍वस्त राम कोल्हटकर यांनी आभार मानले.

फोटो
११३९०