
मधुवंती ते ‘एकला चलो रे’!
पुण्याचा सवाई गंधर्व महोत्सव आणि रसिकांचा उदंड प्रतिसाद हे समीकरण ठरलेले आहे. कोविडच्या दोन वर्षाच्या खंडानंतर, आर्य प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या ६८व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात श्रोत्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली.
पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांचे ज्येष्ठ शिष्य आणि किराणा घराण्याचे गायक पं. उपेंद्र भट यांच्या गायनाने महोत्सवाची सुरेल सुरुवात झाली. त्यांनी मधुवंती रागामध्ये दोन बंदिशी सादर केल्या. राग विस्तारात पंडितजींचा सरगमवर विशेष भर दिसला. सारंगी व हार्मोनियमअशी दोन स्वर वाद्ये असल्याने मंचावरील कलाकारांमधे सांगीतिक देवाण घेवाण अधिक झाली. शेवटी ‘बिजलीचा टाळ, नभाचा मृदंग’ हा अभंग सादर करून पंडितजींनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना तबल्याची साथ सचिन पावगी, हार्मोनिअम निरंजन लेले, पखवाज मनोज भांडवलकर, सारंगी फारुख लतीफ खान, स्वरसाथ अनमोल थत्ते, देवव्रत भातखंडे, धनंजय भाटे व टाळ माऊली टाकळकर यांनी केली.
सवाईच्या मंचावरच्या दुसऱ्या कलाकार होत्या शाश्वती मंडल, ज्यांनी यापूर्वी देखील याच मंचावर रसिकांची दाद मिळवलेली आहे. शाश्वती या ग्वाल्हेर घराण्याच्या तरुण पिढीतल्या अत्यंत तयारीच्या गायिका. मैफिलीची सुरवात त्यांनी राग मारवाने केली. या रागाला अभिप्रेत असलेला ठहराव व मींडयुक्त गायकीचं प्रदर्शन त्यांनी केलं. मारव्याचे गांभीर्य राखत, अलंकारिक स्वर विस्तार करत त्यांनी मैफिलीत रंग भरला. टप्पा हा पंजाब प्रांततला गीत प्रकार, वैचित्रपूर्ण तानांमुळे ओळखला जातो. हा प्रकार खूप कमी गायला जातो पण शाश्वती मंडल यांचा त्यात विशेष हातखंडा आहे. त्यांना तबला साथ भरत कामत, हार्मोनिअम डॉ. मौसम आणि तानपुरा साथ स्वाती तिवारी व आकांशा ग्रोवर यांनी केली.
मंचावर सादर होणाऱ्या कलाकृतीचं जेवढं श्रेय गायकाचं तेवढंच श्रेय संगतकारांचं देखील असतं. याच भावनेने मंचावरील सर्व संगतकारांना नमस्कार करून रतन मोहन शर्मा यांनी सवाईच्या मंचावर आपली कला सादर केली. कै. पं. जसराज यांचे ते शिष्य व भाचे असल्याने घरातूनच त्यांना संगीताचा वारसा मिळाला आहे. राग गोरख कल्याणमधे विविध श्लोकांमधून त्यांनी राग विस्तार केला. छोट्या हरकती व मुरक्यांमधून त्यांनी राग खुलवला. त्यांचे पुत्र व शिष्य स्वर शर्मा याने त्यांच्या बरोबरीने गायन साथ केली. सुरेल दीर्घ लांबवलेला सुरेल स्वर रसिकांना कायमच आनंद देऊन जातो, तसाच आनंद या दोन्ही कलाकारांनी रसिकांना दिला. शाश्वती मंडल व रतनजींना स्वरसाथ करणाऱ्या त्यांच्या शिष्यांच्या सुरेल साथीवरून त्यांचे विद्यादानाचे कौशल्य लक्षात आले. त्यावरुन शास्त्रीय संगीताची धुरा अत्यंत समर्थ खांद्यावर आहे अशी खात्री वाटते. रतनजींच्या मध्य लय व द्रुतलयीच्या बंदिशीत तबला व पखवाज या दोन्ही वाद्यांच्या एकत्र साथीने बंदिशीत विशेष रंग भरला. तिहाई असलेला वैशिष्ट्यपूर्ण तराणा, द्रुत लय आणि तराण्याच्या बोलांचे द्रुत उच्चार या सर्वांच्या एकत्रित सादरीकरणाने गोरख कल्याणने विशेष उंची गाठली. सर्वसाधारणपणे हवेली संगीत हा दुर्मिळ गीत प्रकार आहे पण सवाईच्या रंगमंचावर, रतनजींनी श्रोत्यांना हवेली संगीताचा आस्वाद दिला. त्यांच्या सादरीकरणाचा समारोप जसराजजींनी गाऊन लोकप्रियकेलेल्या ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या भजनाने झाला. त्यांना तबला साथ अजिंक्य जोशी, हार्मोनियम अभिनय रवांदे, पखावजवर सुखद मुंडे तर तानपुऱ्यावर वैदेही अवधानी व भाग्यश्री कुलकर्णी यांनी साथ केली.
दहाला मैफल संपविण्याची खंत
पहिल्या दिवशीच्या सत्राची सांगता उस्ताद अमजद अली खान यांच्या सरोद वादनाने झाली. साठ वर्षांहून अधिक सांगीतिक कारकीर्द असलेल्या उस्तादजींचं, श्रोत्यांनी उभं राहून स्वागत केलं. त्यांच्या मैफिलीची सुरवात तबल्याच्या जुगलबंदीने झाली. किराणा घराण्यात शुद्ध कल्याण राग विशेष गायला वाजवला जातो, तोच राग त्यांनी सादरीकरणासाठी निवडला. विलंबित लयीत सादरीकरण न करता त्यांनी द्रुत लयीत चार रचना ऐकवल्या. त्यांना तबला साथ अनुप्रत चॅटर्जी व अमित कवठेकर या दोघांनी केली. श्रोत्यांची बदलती अभिरुची या बदलामागे कारणीभूत असावी व काळानुरूप शास्त्रीय संगीताही नवीन प्रयोग व बदल होणं स्वाभाविकच आहे. इतर शहरात रात्र रात्र मैफिली होतात पण पुण्यात मात्र दहाला मैफल संपवावी लागते अशी खंत व्यक्त करत उस्तादजींनी राग दरबारी कानडा सादर केला. त्यानंतर खमाज रागात ‘एकला चलो रे’ या रचनेच्या सादरीकरणातून पहिल्या दिवसाची सांगता झाली.