हवामान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हवामान
हवामान

हवामान

sakal_logo
By

पुणे परिसरात गारठा पुन्हा वाढणार

पुणे, ता. १५ ः शहरात ढगाळ वातावरण कमी होऊन निरभ्र राहण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरात किमान तापमानाचा पारा हळू-हळू कमी होत गारठा पुन्हा वाढण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

शहरात गुरुवारी (ता. १५) १७.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. गेल्या तीन ते चार दिवसात शहरात ढगाळ वातावरणाचे सावट कायम होते. तर अधून-मधून शहरासह जिल्ह्यातील तुरळक भागात पावसाच्या हलक्या सरीही पडल्या. त्यामुळे किमान तापमानात झपाट्याने वाढ झाली होती. चक्क १० अंशांच्या खाली गेलेला पारा २० अंशांपर्यंत पोचला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या प्रणालीमुळे पुण्यात ढगाळ वातावरणाची स्थिती तयार झाली होती. परंतु, आता ही प्रणाली निवळून गेल्याने पुढील आठवडाभर आकाश निरभ्र राहणार आहे. त्यात किमान तापमानात सातत्याने घट होत थंडी वाढण्याचा अंदाज आहे.

राज्यातही कोसळल्या पावसाच्या सरी ः
उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात बुधवारी (ता. १४) पावसाच्या मध्यम ते जोरदार सरींनी हजेरी लावली होती. तसेच मराठवाड्यात औरंगाबाद येथे जोरदार पाऊस झाला. एकीकडे बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात एकापाठोपाठ तयार होणाऱ्या प्रणाली तर, दुसरीकडे या प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरण आणि पावसाची स्थिती पाहायला मिळाली. दरम्यान, शुक्रवारी (ता. १६) राज्यात ढगाळ वातावरणासह, तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे.

राज्यात गुरुवारी (ता. १५) नीचांकी तापमानाची नोंद महाबळेश्‍वर येथे १६ अंश सेल्सिअस झाली. राज्यात बऱ्याच ठिकाणी पारा सरासरीपेक्षा तीन ते नऊ अंशांनी वाढला असून किमान तापमान १६ ते २० अंशांदरम्यान आहे. त्यामुळे उकाडा ही जाणवत आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार पूर्व-मध्य बंगालच्या अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. ही ‍प्रणाली भारताच्या किनाऱ्यापासून दूर पश्‍चिमेकडे सरकत असून याची तीव्रता हळूहळू ओसरण्याची चिन्हे आहेत. त्यातच आता आग्‍नेय बंगालच्या उपसागरात गुरुवारी (ता. १५) सकाळी कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे.